मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाने आयोजित केलेल्या ३५ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्क्रिप्टीज क्रिएशन्स या संस्थेच्या ‘असेन मी.. नसेन मी…’ या नाटकाने ७ लाख ५० हजार रुपयांचे प्रथमपारितोषिक पटकावले. तर, कलाकारखाना आणि शांताई या संस्थेच्या ‘वरवरचे वधू-वर’ या नाटकाने ४ लाख ५० हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक आणि सुमुख चित्र या संस्थेच्या ‘उर्मिलायन’ या नाटकाने ३ लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक पटकावले, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली.

दादर येथील श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात ६ ते १६ मे या कालावधीत ३५व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेची महाअंतिम फेरी पार पडली, या फेरीत एकूण १० नाट्यप्रयोग सादर करण्यात आले. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून विजय गोखले, संजय डहाळे, मिलिंद शिंदे, आशा शेलार व लीना भागवत यांनी काम पाहिले. तर समन्वयक म्हणून राकेश तळगावकर यांनी जबाबदारी सांभाळली. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले. तर सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी पारितोषिक प्राप्त कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेचा सविस्तर निकाल हा महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत समाजमाध्यम खात्यांवर उपलब्ध आहे.

स्पर्धेत झळकलेली सर्वच नाटके आणि त्यामागचे प्रचंड परिश्रम, दर्जेदार सादरीकरण आणि रसिकांची भरघोस उपस्थिती यामुळे मराठी रंगभूमीचा वैभवशाली चेहरा पुन्हा एकदा उजळून निघाला. भविष्यातही नाट्यनिर्माते व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी. मराठी व्यावसायिक रंगभूमी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. ही परंपरा जपण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी सरकार सदैव कटिबद्ध आहे, असे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निकाल

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन प्रथम पारितोषिक (१ लाख ५० हजार रुपये) : अमृता सुभाष, असेन मी… नसेन मी…
  • सर्वोत्कृष्ट लेखन प्रथम पारितोषिक (१ लाख रुपये) : संदेश कुलकर्णी, असेन मी… नसेन मी…
  • सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना प्रथम पारितोषिक (४० हजार रुपये) : प्रदीप मुळ्ये, गोष्ट संयुक्त मानापमानाची
  • सर्वोत्कृष्ट नेपथ्य प्रथम पारितोषिक (४० हजार रुपये) : प्रदीप मुळ्ये, असेन मी… नसेन मी…
  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन प्रथम पारितोषिक (४० हजार रुपये) : निषाद गोलांबरे, वरवरचे वधूवर
  • सर्वोत्कृष्ट वेशभूषा प्रथम पारितोषिक (४० हजार रुपये) : मयूरा रानडे, गोष्ट संयुक्त मानापमानाची
  • सर्वोत्कृष्ट रंगभूषा प्रथम पारितोषिक (४० हजार रुपये) उदयराज तांगडी, उर्मिलायन