मुंबईः राज्यात येणारे उद्योग शेजारील गुजरात पळवत असल्याचा आरोप होत असतानाच परदेशी गुंतवणुकीतील आपले स्थान महाराष्ट्राने कायम राखले आहे. गेल्या आर्थिक वर्षात देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीपैकी एकूण १ लाख,६४ हजार ८७५ कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक राज्यात आली असून ती देशातील एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के आहे.

विक्रमी गुंतवणुकीच्या माध्यमातून विदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रावरच विश्वास दाखवल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली.

केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राने आपले पहिले स्थान कायम राखले आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्यात १ लाख, ६४ हजार ८७५ कोटी रुपयांची विक्रमी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. देशात आलेल्या एकूण ४ लाख २१ हजार ९२९कोटी रुपयांपैकी ४० टक्के गुंतवणूक राज्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा राज्यात ३२ टक्क्यांनी अधिक गुंतवणूक झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.

दहा वर्षातील उच्चांक

गेल्या आर्थिक वर्षात (जानेवारी ते मार्च दरम्यान) शेवटच्या तिमाहीत २५ हजार ४४१ कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात आली. गेल्या १० वर्षांतील सर्वोच्च परकीय गुंतवणुकीचा नवा उच्चांक यंदा प्रस्थापित झाला आहे. विशेष म्हणजे, आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांतच हा टप्पा पार केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गत आर्थिक वर्षात देशात आलेल्या परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्रानंतर कर्नाटकचा क्रमांक लागतो. कर्नाटकात ५६ हजार ३० कोटी म्हणजेच देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या २० टक्के परदेशी गुंतवणूक आली आहे. तर गुजरातमध्ये १६ टक्के म्हणजेच ४७ हजार ९४७ कोटींची गुंतवणूक आली आहे.

राज्यात गेल्या दहा वर्षांतील विदेशी गुंतवणूक

वर्ष                                    गुंतवणूक

२०१५-१६                 ६१ हजार ४८२ कोटी

२०१६-१७                   एक लाख ३१ हजार ९८० कोटी

२०१७-१८                 ८६ हजार २४४ कोटी

२०१८-१९                ५७ हजार १३९ कोटी

एप्रिल ते ऑक्टोबर २०१९ : २५ हजार ३१६ कोटी

२०२०-२१ एक लाख १९ हजार ७३४ कोटी

२०२१-२२ एक लाख १४ हजार ९६४ कोटी

२०२२-२३ एक लाख १८ हजार ४२२ कोटी

२०२३-२४ एक लाख, २५ हजार, १०१ कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२४-२५ एक लाख, ६४ हजार, ८७५ कोटी