मुंबई : ‘राज्यात आणि केंद्रात एका विचारांचे सरकार असेल तर विकासाला वेग येतो. गेल्या दहा वर्षांत राज्यात झालेला विकास हा त्याचा साक्षीदार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात विकासात अनेक गतिरोधक उभे केले गेले. हे गतिरोधक आम्ही दूर केले,’ असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला. ‘बटेंगे तो कटेंगे’बाबत विचारणा केली असता, ‘निवडणुकीच्या प्रचारात वेगवेगळे मुद्दे पुढे आले असले तरी इतर कोणत्याही विषयापेक्षा विकास हाच आमचा अजेंडा आहे’ असे ठाम प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी केले.

विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपण्यास काही तासांचा कालावधी शिल्लक असताना ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आले तर ‘मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्त्व वाढेल’ असा दावाही केला. मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे. त्यामुळे त्याच्या विकासासाठी हात आखडता घेणार नाही अशी ग्वाही खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. तसेच देशाला महासत्ता करण्यासाठी महाराष्ट्राला देशाचे नेतृत्व करायचे आहे असेही पंतप्रधान म्हणाले आहेत. त्यामुळे केंद्राशी, पंतप्रधानांशी अबोला धरणारे हेकेखोर सरकार हवे की पंतप्रधानांच्या हातात हात घालून राज्याला विकासपर्वाकडे नेणारे महायुतीचे सरकार हवे याचा निर्णय राज्यातील सुजाण जनतेने यापूर्वीच घेतला असून निकालात तुम्हाला या निर्णयाचे प्रतिबिंब उमटलेले दिसेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा : Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?

या निवडणुकीच्या प्रचारात ‘बटेंगे तो कटेंगे’ स्वरूपाचा प्रचार मोठ्या प्रमाणात दिसत आहे. या आखणीचा नेमका उद्देश काय, असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले,‘आम्ही विकास आणि लोककल्याणाचा अजेंडा घेऊनच मतदारांना सामोरे जात आहोत. राज्यात नवे उद्याोग यावेत, रोजगारनिर्मिती व्हावी, अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी गेल्या दोन वर्षात आमच्या सरकारने भरीव काम केले आहे. माविआचे अडीच वर्षातील सरकार विकास विरोधी आणि महाराष्ट्र विरोधी होते. त्यांनी विकास प्रकल्पांमध्ये टाकलेले गतीरोधक आम्ही उखडून टाकले आणि विकासाला गती दिली. आम्हाला दोन वर्षांचा कमी काळ मिळाला असला तरी गेल्या दहा वर्षात झाले नसेल एवढे काम आम्ही करून दाखवले. अनेक आघाड्यांवर दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर गेलेल्या महाराष्ट्राला पुन्हा क्रमांक एक वर आणण्याचे काम आम्ही केले आहे. आणखी खूप करायचे आहे. महाराष्ट्रातील जनता आमच्या कामावर खूश आहे. त्यामुळे निवडणुकांसाठी दुसऱ्या कुठल्याही अजेंड्यांची आम्हाला गरज नाही. विकासाच्या अजेंड्यावरच पुन्हा महायुतीचे सरकार येणार हे मी तुम्हाला छातीठोकपणे सांगतो.’

हेही वाचा : Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्राशी अबोला धरणारे सरकार नको

केंद्र आणि राज्यात एकाच विचारसरणीचे सरकार असले तरच राज्याच्या विकासाला गती प्राप्त होते हे जनतेने अनुभवले आहे. आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात केंद्र सरकारसोबत अबोला धरल्याने राज्याचे मोठे नुकसान झाले. परंतु , ती अडीच वर्ष वगळता उर्वरित साडेसात वर्षात केंद्राने राज्यातील विकास कामांसाठी १० लाख कोटींचा घसघशीत निधी दिला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी ‘डबल इंजिन’ सरकारला पर्याय नाही, असेही त्यांनी सांगितले.