मुंबई : मागील आठवडाभरापासून विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे आलेला कांदा, सोयाबीन, वेचणीवर आलेला कापूस, मका, टोमॅटो, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर पावसाच्या धसक्याने रायगडमधील भातकापणी ठप्प पडली असून, पुण्यात भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी नैर्ऋत्येकडे सरकले. पुढील २४ तासांत हे कमी दाबाचे क्षेत्र नैर्ऋत्येकडे आणि नंतर पूर्व-मध्य अरबी समुद्र ओलांडण्याची शक्यता आहे. हे कमी दाब क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील हवामान कोरडे होण्याचा अंदाज आहे.

मुंबईसह ठाणे, नवी मुंबईत रिपरिप,

मुंबईसह उपनगरातील काही भागांत शनिवारपाठोपाठ रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. त्यानंतर सायंकाळी पावसाचा जोर काहीसा वाढला. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत १४.६ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ६.६ मिमी पावसाची नोंद झाली. याचबरोबर ठाणे, नवी मुंबई भागातही पाऊस झाला.

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे २९ ऑक्टोबरपर्यंत वाऱ्याचा वेग ३५ ते ४५ किमी प्रतितास राहील. काही ठिकाणी तो ५५ किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

नागरिकांना तापमान दिलासा

राज्यात पाऊस पडत असल्याने तापमानात घट झाली आहे. गेले दोन-तीन दिवस तापमान सरासरी इतके नोंदले जात आहे. ज्या भागात तापमानाचा पारा ३५ अंशापुढे नोंदला जात होता, त्या भागातील तापमानात आता बऱ्यापैकी घट झाली आहे. अनेक ठिकाणी तापमान २९ ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदले आहे. अकोला येथे रविवारी २९.२ अंश सेल्सिअस, बुलढाणा २९.२ अंश सेल्सिअस, गोंदिया २९.६ अंश सेल्सिअस आणि यवतमाळ ३० अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. त्याचबरोबर इतर भागातही तापमानाचा पारा ३० ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान होता.

रायगडमध्ये ‘यलो अलर्ट’

रायगड जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पटृटा निर्माण झाल्याने कोकणासह राज्याच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. रायगडसह संपूर्ण कोकणात ३० ऑक्टोबरपर्यंत पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर शेतकऱ्यांनी कापणीची कामे थांबवली आहेत.

पर्यटकांचा हिरमोड

दिवाळीचा सण सुरू झाल्यापासूनच रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे. मात्र बदलत्या वातावरणाचा फटका पर्यटन व्यवसायालाही बसला. पावसामुळे पर्यटकांचा हिरमोड होत असून, किनाऱ्यांवरील गर्दी कमी झाली आहे. खराब हवामानामुळे किनाऱ्यांवर तीन नंबरचा बावटा लावण्यात आल्यामुळे गेटवे ते मांडवा जलवाहतूक सेवा शनिवारी संध्याकाळपासूनच थांबवण्यात आली आहे.