मुंबई : शिवरायांच्या वाघनखांपाठोपाठ नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडन येथे लिलावात निघालेली तलवार मिळविण्यात राज्य सरकारला यश आले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी केली. ही तलवार लिलावात निघाल्याचे वृत्त आल्यानंतर शेलार यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली आणि ही तलवार राज्य शासनाला मिळावी, या दृष्टीने नियोजन करण्यात आले.

सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांना दूतावास संपर्क व या कामाची जबाबदारी देऊन फडणवीस आणि शेलार यांनी याबाबतचे नियोजन व संपर्क यंत्रणा उभी केली. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे शेलार यांनी तातडीने एक मध्यस्थ उभा करून या लिलावात शासनाने सहभाग घेतला व लिलाव जिंकला. यासाठी हाताळणी, वाहतूक व विमा आदींपोटी सुमारे ४७ लाख १५ हजार रुपये खर्च अपेक्षित असून तो राज्य सरकार देणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

ऐतिहासिक महत्त्व

रघुजी भोसले यांची युद्धनीती आणि शौर्य पाहून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती. रघुजी भोसले यांनी १७४५ मध्ये बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा विस्तार बंगाल, ओडिशापर्यंत केला होता. त्यांनी चांदा, छत्तीसगढ, संबळपूर यासह दक्षिण भारतातील कुड्डाप्पाचा नवाब, कर्नूलचा नवाब यांचाही पराभव करून आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता. ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र सरकार ही तलवार घेणार असल्याने समाधान आहे. यासंदर्भात सरकारकडे विनंती केली होती. -राजे रघुजी भोसले,

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.