मुंबई : ‘आपल्याला मुख्यमंत्रीपदाची लालसा नाही. राज्याचा, जनतेचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आहे. त्यासाठी पुढील विकासाचा आराखडा (व्हिजन) महिन्याभरात मांडणार आहोत. गेल्या अडीच वर्षांत केलेल्या कामांची पोचपावती देण्यास जनता उत्सुक असून या निवडणुकीत महायुतीला १६० पेक्षा अधिक जागा मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केला.

महाविकास आघाडीचा सत्तेचा दरवाजा राज्यातील लाडक्या भाऊ-बहिणींनी रोखला असून, पुन्हा महायुतीला कौल मिळेल हे स्वच्छ आणि स्पष्ट आहे. आमच्यात मुख्यमंत्रीपदावरून कसलाही वाद नसून एक संघ (टिम) म्हणून आम्ही काम करीत आहोत. ‘मला काय मिळेल, यापेक्षा राज्यातील जनतेला काय मिळाले, शेतकरी, लाडक्या बहीण-भावांना काय-काय, कसे मिळेल हे आम्ही पाहात आहोत. याउलट महाविकास आघाडीत मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण यावरून भांडणे सुरू आहेत. माझा चेहरा, माझा चेहरा म्हणणाऱ्यांचा चेहरा जर महाविकास आघाडीलाच आवडत नाही, तर महाराष्ट्रातील जनतेला कसा आवडेल असा टोलाही त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी घटना बदणार, आरक्षण रद्द होणार, दलित, आदिवासी, मुस्लीम, ख्रिाश्चनांमध्ये खोटे कथानक पसरवून मतदारांच्या मनात संभ्रम निर्माण केला होता. महाविकास आघाडीने तेव्हा घातलेली भीती निरर्थक असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

महायुतीला जिंकविण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याचा दावा शिंदे यांनी यावेळी केला. शिवसेना प्रचारात राज्याच्या सर्वांगीण विकासावर भर देत असताना दुसरीकडे भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारा देत हिंदुत्वाच्या मुद्याला प्राधान्य देत असल्यावरून महायुतीमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाबद्दल विचारले असता ते म्हणाले, की भाजपही विकासाच्या मुद्द्यांवर भर देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही विशिष्ट जाती-धर्माबाबत भाष्य केलेले नाही. लोकशाहीत एकसंध राहण्याचे आवाहन करणे, एकजूट दाखवून मतदानाची टक्केवारी वाढवा असे आवाहन करणे गुन्हा आहे का, असा सवाल त्यांनी केला. देशात काँग्रसने ब्रिटिशांच्या फोडा आणि राज्य करा नीतीचा अवलंब सुरू केला आहे. अशा वेळी एकसंध राहण्याचे आवाहन करण्यात काहीही गैर नाही, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> ओबीसींची एकगठ्ठा मते मिळणे कठीणच; महायुतीबाबत अजित पवार यांचे मत

मोदींच्या काळात सर्वाधिक मदत

मनमोहन सिंग सरकारच्या काळात १० वर्षांत राज्याला जेमतेम दोन लाख कोटी रुपयांची मदत मिळाली होती. तर मोदी यांच्या काळात १० लाख कोटींचा निधी मिळाला आहे. जगातील पहिल्या १० बंदरांमध्ये वाढवण बंदराचा समावेश होत असून त्यासाठी केंद्राने ७६ हजार कोटींची मदत केली आहे. या बंदरामुळे पालघर-डहाणू परिसराचा कायापालट होणार आहे. महायुतीने राज्याच्या विकेंद्रित विकासाला प्राधान्य दिले असून शिघ्र संचार द्रुतगती महामार्गांच्या माध्यमातून राज्याच्या एका भागातून दुसऱ्या भागात जास्तीत जास्त सहा तासांत पोहोचता यावे अशी दळणवळणाची व्यवस्था निर्माण करणार आहोत. महाराष्ट्राच्या पुढील विकासाचा आराखडा- ‘व्हिजन २०२९’ महिनाभरात जाहीर करणार असून त्यात प्रामुख्याने सर्व क्षेत्रांचा-घटकांचा विकास, शेतीपूरक जोडधंदे, नदीजोड प्रकल्प, दळणवळण सुविधा, उद्याोग, परवडणारी घरे, भाड्याची घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबई, लोकांचे जीवनमान सुसह्य करणाऱ्या कल्याणकारी योजनांवर भर देण्यात येणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी काही नवीन मार्ग, जोड रस्ते यासोबतच रिंगरोडही बांधण्यात येणार आहेत. महागड्या घरांमुळे मुंबईबाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मु्बंईत आणून बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न साकार करण्याचा आपला ध्यास असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठा समाजाच्या हिताचेच निर्णय

मराठा समाजासाठी जे जे करता येईल, ते सरकारने केले असून अजूनही करण्याची तयारी आहे. ज्यांनी मराठा समाजास आरक्षणापासून, लाभापासून वंचित ठेवले त्यांना मनोज जरांगे पाटील यांनी जाब विचारण्याची गरज आहे. अन्य कोणत्याही समाजावर अन्याय न करता कायद्यात जे बसेल ते सर्व मराठा समाजास देण्याची सरकारची तयारी आहे. पण जरांगे यांनी आमच्यावर विश्वास ठेवून महायुतीला पाठिंबा द्यावा, असे आवाहन शिंदे यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही निवडणूक स्थानिक प्रश्न, विकासाच्या मुद्द्यावर असून लोकांनाही ते कळले आहे. त्यामुळे यावेळी जनता विरोधकांच्या खोट्या कथानकाला फसणार नाही. महायुती सरकारच्या सर्व योजना लोकप्रिय ठरल्या असून पुन्हा सत्तेवर येण्यासाठी महायुतीला पोषक वातावरण आहे. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री