मुंबई : माहीम येथील महापालिकेच्या न्यू माहीम शाळेच्या इमारतीची नव्याने संरचनात्मक तपासणी करण्यात आली असून त्यानुसार इमारत पाडण्यात येणार आहे. मात्र, संबंधित इमारत सुस्थितीत असल्याचा दावा विविध संघटनांनी केला आहे. पालिकेच्या निर्णयाविरोधात मराठी अभ्यास केंद्र व अन्य संबंधित संघटनांनी रविवारी माहीममध्ये आंदोलन करण्यात आले. तसेच, येत्या दोन दिवसांत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी माहिम शाळेचे पाडकाम कायमचे थांबवण्याची अधिकृत घोषणा करावी, अशी मागणी करण्यात आली.

न्यू माहीम शाळेचे सुमारे सात – आठ वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले होते. अल्पावधीतच शाळा धोकादायक असल्याचे घोषित केल्यामुळे पालक संतप्त झाले होते. तसेच, यासंदर्भात शाळेबाहेर कोणतीही नोटीस न लावता विद्यार्थ्यांना अन्य शाळांमध्ये स्थलांतरित करण्यात आले होते. अनेकांनी याविरोधात संताप व्यक्त केला.

पालिकेच्या या निर्णयाविरोधात स्थानिक पातळीवर आंदोलनही झाले. आम आदमी पक्षाच्या प्रणाली राऊत यांनीही याविरोधात आवाज उठवला होता. त्यानंतर मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार आणि अभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी म्हाडाचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर प्रभू यांच्यासत शाळेची पाहणी केली.

संबंधित शाळेला किरकोळ डागडुजीची आवश्यकता असल्याचे मत प्रभू यांनी व्यक्त केल्याचे मराठी अभ्यास केंद्राने सांगितले होते. त्यानंतर अनेकांनी आग्रह धरल्यामुळे पुन्हा नव्याने संरचनात्मक तपासणी करण्यात आली. त्यानुसार, इमारतीची दुरुस्ती करून ती इमारत अनेक वर्ष सुस्थितीत राहील, असे अहवालात नमूद करण्यात आले होते.

मात्र, त्यानंतर पुन्हा नव्याने संरचनात्मक तपासणी करून नवीन अहवाल मागविण्यात आला. त्यानुसार इमारतीचे पाडकाम केले जाणार आहे. मात्र, मराठी अभ्यास केंद्र, शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती तसेच, मराठी एकीकरण समितीने विरोध केला आहे. त्याविरोधात रविवारी आंदोलन करत विविध मागण्या करण्यात आल्या.

माहीम शाळेसाठी आवाज बुलंद.

येत्या दोन दिवसांत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी माहिम येथील शाळेचे पाडकाम कायमचे थांबवण्याची अधिकृत घोषणा करावी. तसेच त्याबाबतच्या चर्चेसाठी दोन दिवसांत वेळ द्यावा, संरचनात्मक तपासणी झालेल्या सर्व मराठी शाळांचे अहवाल महापालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावेत, डागडुजी केल्यानंतर अवघ्या काही काळात शाळा धोकादायक ठरत असल्यास कामातील हलगर्जीप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करावा, मुंबईतील मराठी शाळांचे केंद्रीय किंवा आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये झालेले रूपांतर तत्काळ रद्द करावे, महापालिकेने शिक्षणासाठी केलेल्या एकूण खर्चामधून मराठी माध्यमाच्या शाळांवरील खर्चाची सर्व माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी, आदी विविध मागण्या आंदोलनात करण्यात आल्या.

आंदोलनात डॉ. दीपक पवार, अभिनेत्री आणि मराठी शाळा सदिच्छादूत चिन्मयी सुमीत, शिक्षण अभ्यासक गिरीश सामंत, आम आदमी पक्षाच्या स्थानिक नेत्या प्रणाली राऊत , मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख, आविष्कार नाट्यसंस्थेचे दीपक राजाध्यक्ष, नाटककार शफाअत खान, अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर आदींसह स्थानिक नागरिक सहभागी झाले होती.