मुंबई : हस्तारक्ष खराब असल्यामुळे मालाडमधील खासगी शिकविणी घेणाऱ्या एका शिक्षिकेने आठ वर्षांच्या मुलाचा हात पेटत्या मेणबत्तीवर धरून चटके दिले. यामुळे मुलाचा हात भाजला असून कुरार पोलिसांनी या शिक्षिकेविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
तक्रारदार मुस्तकिन खान (५०) मालाड (पूर्व) येथील पिंपरीपाडा येथे राहतात. त्यांचा मुलगा मोहम्मद हमजा खान (८) हा लक्षधाम शाळेत इयत्ता तिसरीत शिकतो. तो मालाड (पूर्व) येथील गोकुलधाममधील जेपी डेक्स इमारतीतील राजश्री राठोड यांच्याकडे शिकवणीसाठी जात होता. दररोज संध्याकाळी ७ ते ९ असे दोन तास ही शिकवणीचे वर्ग चालतात. २८ जुलै रोजी संध्याकाळी नेहमीप्रमाणे हमजाची बहीण रूबिनाने त्याला शिकवणीसाठी राठोडच्या घरी सोडले. रात्री नऊच्या सुमारास शिक्षिका जयश्री राठोडने हमजाचे वडील मुस्तकीन खान यांना फोन केला. हमजा खूप रडत असून त्याला त्वरित घरी घेऊन जा, असे तिने सांगितले.
पेटत्या मेणबत्तीवर हात धरून शिक्षा
हमजाची मोठी बहिण रूबीना त्याला घेण्यासाठी गेली होती. तेव्हा हमजा खूप रडत होता. त्याच्या उजव्या हातावर भाजल्याच्या गंभीर जखमा होत्या. रूबिनाने याबाबत राठोड यांना विचारले, तेव्हा तिने टोलवाटोलवी केली. घरी गेल्यावर हमजाने वडिलांना घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली. शिक्षिकेने हस्ताक्षर खराब असल्याने शिक्षा म्हणून पेटत्या मेणबत्तीवर हात धरल्याचे त्याने सांगितले. याबाबत खान यांनी राठोड यांच्याकडे विचारणा केली. मुलांना शिस्त लावण्यासाठी हे कृत्य केल्याची कबुली तिने दिली.अशा प्रकारची शिक्षा अमानवी कृत्य असून याबाबत जाब विचारला असता जयश्री राठोडनेच उलट शिविगाळ केली, असे खान यांनी तक्रारीत म्हटले आहे.
शिक्षिकेवर विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल
हमजाला उपचारासाठी कांदिवली पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात (शताब्दी) नेण्यात आले. खान यांनी कुरार गाव पोलीस ठाण्यात जयश्री राठोडविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ च्या कलम ७५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या ११५ (२), ११८ (१) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
लहान मुलांवरील शिक्षेच्या घटना
२८ नोव्हेंबर २०२४
नायगावमध्ये एका शिक्षिकाने १२ वर्षांचा विद्यार्थी मयंकला क्षुल्लक कारणावरून कंपासने मारहाण केली. मंयकच्या वर्गमित्राने त्याच्याकडे पाण्याची बाटली मागितली होती. मयंकने ती त्याच्या दिशेने फेकली, मात्र ती खाली पडली. त्यामुळे हिंदीचा शिक्षक चंदन प्रजापती (३५) याने मयंकला बेदम मारहाण केली होती.
५ ऑक्टोबर २०२४
नालासोपारा पूर्व येथील ओस्वाल नगरी परिसरात राहणारी दीपिका पटेल (१०) इयत्ता पाचवीत शिकत होती. ती याच परिसरातील रिना क्लासेसमध्ये खासगी शिकवणीसाठी जात होती. ५ ऑक्टोबर रोजी ती वर्गात मस्ती करीत असल्याने शिकवणी घेणारी शिक्षिका रत्ना सिंग (२०) हिने दीपिकाच्या उजव्या कानाखाली जोरदार थप्पड मारली. यामुळे तिच्या कानातील कर्णफुलाचा मागील भाग कानाच्या पाठीमागील बाजूला लागून दुखापत झाली. तिच्यावर मुंबईच्या खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू होते. अनेक दिवस तिला जीवन सुरक्षा प्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते.