मुंबई : एका तरुणीला अश्लील आणि बदनामीकार ई-मेल पाठवून तिचा लैंगिक छळ करणाऱ्या उच्चशिक्षित आरोपीला दहिसर पोलिसांनी अटक केली. आरोपी फिर्यादी तरुणीच्या परिचयाचा असून उभयतांमध्ये वाद झाल्यामुळे बदला घेण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपली ओळख लपवून ई-मेल पाठवले होते. त्यामुळे त्याला शोधून काढण्याचे पोलिसांपुढे आव्हान होते.
फिर्यादी तरूणी ३० वर्षांची असून एका खासगी कंपनीत उच्चपदावर कार्यरत आहे. नोव्हेंबर महिन्यात तिला अश्लील मजकूर असणारे ई-मेल येऊ लागले होते. या ई-मेलमध्ये तिच्याबाबतीत बदनामीकारक मजकूर प्रसारित करण्यात आला होता. तिच्या खासगी जीवनातील गोष्टी यात उघड करण्यात आल्या होत्या. हे ई-मेल पाहून तिला धक्का बसला. परंतु ई-मेल पाठविणाऱ्याने आपले नाव लपवून ठेवले होते. त्यामुळे ई-मेल कुणी पाठवला ते समजत नव्हते. याप्रकरणी तिने दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात विनयभंग, लैंगिक शेरेबाजी करणे, बदनामीकारक मजकूर प्रसारित करणे आदींबाबत माहिती तंत्रज्ञान कलमाअंर्गत गुन्हे दाखल केले.
आरोपीने आपली ओळख कळू नये याची खबरदारी घेतली होती. तो आभासी खासगी नेटवर्क अर्थात व्हिपीएनचा (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) वापर करीत होता. त्यामुळे त्याला पकडणे कठीण झाले होते. दुसरीकडे या ई-मेल्स मुळे फिर्यादी तरुणी मानसिक तणावात होती. त्यातच तिच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनवाट खाते तयार करून तिची आणखी बदनामी करण्यात आली होती. दहिसर पोलिसांनी सायबर तज्ञाच्या मदतीने या प्रकरणाचा छडा लावण्यास सुरुवात केली. गुगल, इन्स्टाग्राम आदी कंपन्यांकडे माहिती मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला. पोलिसांनी जीमेलचे रिकव्हरी खाते मिळवले. तांत्रिक तपासातून एक संशयास्पद ई-मेल खाते मिळाले. पोलिसांनी मग आयपी ॲड्रेस शोधला. सर्व्हिस प्रोव्हायडरकडून एकाच आयपी ॲड्रेसवरून ४ जणांना कनेक्शन देण्यात आले होते. अखेर पोलिसांनी तांत्रिक तपास करून एका आरोपीला अटक केली.
मानलेला भाऊच निघाला आरोपी
या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीला पाहून फिर्यादी तरुणीला धक्का बसला. तो आरोपी तिच्या समोरच्या घरात राहणारा होता. तो तिला बहीण मानत होता. त्यानेच तिचा लैंगिक छळ केला. याबाबत माहिती देताना दहिसर पोलिसांनी सांगितले की, आरोपी मोहीत शाह (४७) गेली अनेक वर्ष इंग्लंडमध्ये वास्तव्यास होता. तो २०२१ मध्ये भारतात परत आला. पत्नीसोबत वाद असल्याने तो दहिसरमध्ये वडिलांकडे राहत होता. तेथे त्याची फिर्यादीबरोबर ओळख झाली. तो तिला बहीण मानत होता. तिची सतत काळजी घेत होता. नवरात्रोत्सवात त्याने तिला रात्री उशीरापर्यंत आणि तिच्या मित्रांसोबत दांडिया खेळण्यासाठी मनाई केली होती. त्यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे आरोपीने बदला घेण्यासाठी हे कृत्य केले. तो आयटी कंपनीत कामाला होता. त्याला तंत्रज्ञानाचे चांगले ज्ञान होते. त्याचा वापर करून त्याने आभासी नेटवर्कचा वापर करून स्वत:चा ई-मेल गोपनिय ठेऊन फिर्यादीला लैंगिक छळ करणारे ई-मेल पाठवले. आरोपीची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.