मुंबई : गुगलवर एका वित्तीय संस्थेचा क्रमांक शोधणाऱ्याला सायबर भामट्यांनी ७३ हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी खार पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
खाल येथे वास्तव्यास असलेल्या ५३ वर्षीय फिर्यादीने दोन वर्षांपूर्वी एका वित्त संस्थेकडून २ लाख रुपये कर्ज घेतले होते. ते नियमित हफ्त्यापोटी दर महिन्याला १० हजार ८५२ रुपये भरत होते. त्यांनी घेतलेल्या कर्जची ७३ हजार ९९० रुपये एवढी रक्कम बाकी होती. ही रक्कम भरून कर्जाचे हप्ते फेडण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी त्यांनी आंतरराजालावरून (इंटरनेट) गुगलच्या संकेतस्थळावरून संबंधित वित्त संस्थेचा क्रमांक शोधला. त्या क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला, पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
दरम्यान, फिर्यादींना एका व्यक्तीने फोन केला आणि त्याने संबंधित वित्त संस्थेतून बोलत असल्याचे सांगितले. त्याने फिर्यादींना कर्जाचा तपशील मेलवर पाठवला. त्यामुळे ती व्यक्ती संबंधित वित्त संस्थेतील अधिकृत व्यक्ती असल्याची त्यांची खात्री पटली. त्यांनी गुगल पेद्वारे कर्जाच्या उर्वरित रकमेपोटी ७३ हजार ९९० रुपये पाठवले.
दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीने आणखी रक्कम भरावी लागेल असे सांगितले. तेव्हा मात्र फिर्यादी यांना संशय आला. याप्रकरणी त्यांनी सायबर पोलिसांच्या मदत क्रमांक १९३० वर आणि नंतर खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (सी), ६६ (डी), तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला.
अधिकृत संकेतस्थळावरूनच माहिती घ्यावी
अनेक जण इंटरनेटवर वेगवेगळ्या प्रकारची माहिती शोधत असतात. त्याचा फायदा सायबर भामटे घेतात. ते नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट पेज तयार करतात. अनेक जण मोबाइल क्रमांकही गुगलवर शोधतात. त्यांना मग बनावट पेजवरील संपर्क क्रमांक मिळतात. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे त्यांची फसवणूक केली जाते. त्यामुळे कुठलीही माहिती हवी असल्याच संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाची खात्री करूनच पुढील व्यवहार करावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. अनोळखी व्यक्तीने पाठवलेली संशयास्पद फाईल डाऊनलोड करू नये, लिंक उघडू नये, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
