मुंबई : लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर भेटलेल्या एका भामट्याने अमेरिकेतील डॉक्टर असल्याची बतावणी करून एका महिलेला अनोख्या पध्दतीने गंडा घातला. युध्द सुरू असलेल्या गाझा सीमेवरून भारतात परतण्याच्या नावाखाली त्याने या महिलेकडून ६ लाख रुपये उकळले. या प्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिला ४८ वर्षांची असून ती बोरिवलीत राहते. तिने जुलै महिन्यात एका लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळावर आपले खाते उघडले होते. तिला ५ जुलै रोजी डॉ. मोहीत गुप्ता नामक व्यक्तीचे खाते दिसले. तो मूळचा भारतीय असून अस्थिरोगतज्ञ म्हणून अमेरिकेत वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे त्याच्या प्रोफाईलमध्ये लिहिले होते. फिर्यादी महिलेने त्याच्याशी संपर्क साधला. या डॉक्टरने तिला आपला मोबाइल क्रमांक दिला. ते दोघे व्हॉटस ॲप क्रमांकावरून बोलू लागले.
गाझा सीमेवरची खोटी कथा..
सध्या इस्त्राएल आणि पॅलेस्टाईन या दोन देशात युध्द सुरू आहे. दोन्ही देशांच्या गाझा सीमेवर हल्ले होत आहेत. तेथील जखमींना वैद्यकीय उपचार करण्यासाठी माझी नियुक्ती केल्याचे या डॉक्टरने सांगितले. मला तुझ्याशी लग्न करण्यासाठी भारतात यायचे आहे. परंतु मला परवानगी मिळत नाही, तसेच तिथे आर्थिक व्यवहारही करता येत नाही अशी थाप त्याने मारली. यासाठी डॉ. मोहीत गुप्ताने फिर्यादी महिलेला लिबरल नामक व्यक्तीचा एक ई-मेल दिला. त्यावर महिलेने डॉ. गुप्ता याच्या सुटीचा अर्ज पाठवला. मात्र डॉ. गुप्ता वैयक्तिक कामासाठी सुट्टी घेत असल्याने लिबरलने प्रवास खर्च म्हणून २ लाख रुपये पाठविण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादी महिलेने बंगळूरच्या पंजाब महाराष्ट्र या बॅंकेच्या खात्यावर पैसे पाठवले.
विविध कारणांसाठी उकळले पैसे
फिर्यादी महिला या भामट्यांच्या जाळ्यात अडकली होती. २ लाख रुपये पाठविल्यानंतर डॉ. गुप्ताने सिंगापूर येथे पोहोचल्याचे या महिलेला सांगितले. तेथे त्याने एनबीआय प्रमाणपत्रासाठी पैशांची मागणी केली. फिर्यादी महिलेने पुन्हा लिबरमन नावाच्या व्यक्तीच्या खात्यात १ लाख ९० हजार रुपये भरले. त्यानंतर पुन्हा टॅक्स क्लिअर्नसच्या नावाखाली २ लाख रूपये मागण्यात आले. ते पैसे देखील या महिलेने भरले. मात्र डॉ. गुप्ता आणि लिबरमन पुन्हा तांत्रिक कारण देत पैशांची मागणी करू लागले.
महिलेला संशय आला
वारंवार पैशांची मागणी केली जात असल्याने महिलेला संशय आला. तुला भारतात अन्य नातेवाईक किंवा मित्र नाहीत का ? तू माझ्याकडेच पैसे का मागतो, असा सवाल तिने केला. तेव्हा डॉ. मोहीत गुप्ता याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा हा फसवणुकीच्या प्रकार असल्याचे तिच्या लक्षात आले. याबाबत महिलेने ५ ऑगस्ट रोजी सायबर हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार केली. त्यानंतर बोरिवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या सायबर फसवणुकीप्रकरणी बोरिवली पोलिसांनी डॉ. मोहीत गुप्ता आणि लिबरमन विरोघात माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क), ६६ (ड), गुन्हेगारी कृत्याचे संगनमत करणे कलम ३ (५) आणि फसवणूक प्रकरणी ३१८ (४) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.