माघी गणेशोत्सवाला बुधवारपासून सुरुवात होत असून सार्वजनिक मंडळांचे मंडप शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. करोना व टाळेबंदीच्या दोन वर्षांनंतर साजऱ्या होणाऱ्या सणांचे शुल्क माफ करण्यात आले होते. त्याच धर्तीवर हे शुल्कही माफ करण्यात आले आहे. ज्या मंडळांनी शुल्क भरले असेल त्यांना शुल्क परत केले जाणार आहे.

माघी गणेशोत्सव बुधवारपासून सुरू होत असून, टाळेबंदी पूर्णपणे उठवल्यानंतरचा हा पहिलाच माघी गणेशोत्सव आहे. मुंबईत माघी गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे तुलनेने कमी आहेत. मात्र दरवर्षी माघी गणेशोत्सव मंडळांसाठी मंडप परवानगी अर्ज आणि नियमावलीची प्रक्रिया राबविण्यात येते. यंदा मात्र गणेशोत्सव आणि प्रजासत्ताक दिन एकत्र आल्यामुळे वाहतूक पोलिसांकडून मिळणारी परवानगी गेल्यावर्षीच्या आधारे दिली जाणार आहे.

हेही वाचा – माघी गणेश जयंतीला जुळले ‘हे’ ३ अत्यंत शुभ मुहूर्त; बाप्पा भक्तांची विघ्न दूर करून देणार श्रीमंतीची संधी

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वतयारीमध्ये पोलीस व्यस्त आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी माघी गणेशोत्सवासाठी परवानगी दिलेल्या मंडळांना यंदा मंडप परवानगी देण्यात आली आहे, अशा मंडळांचे अर्ज स्थानिक / वाहतूक पोलिसांकडे न पाठवता, मागील वर्षीची परवानगी ग्राह्य धरून विभाग कार्यालयांमार्फत छाननी करून परवानगी देण्यात येणार आहे. मंडप परवानगीसाठी प्रथमच अर्ज करणाऱ्या मंडळांच्या अर्जांच्या बाबतीत मात्र स्थानिक / वाहतूक पोलिसांचे नाहरकत प्रमाणपत्र आवश्यक असेल. माघी गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गरज भासल्यास कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. विभाग स्तरावर पडताळणी करून त्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. करोना किंवा विविध प्रकारांच्या प्रादुर्भावाचा संभाव्य धोका विचारात घेता, शासनाने उत्सव कालावधीत निर्बंध जारी केल्यास, त्यांचे पालन केले जाईल, अशा आशयाचे हमीपत्र मंडळांकडून स्वीकारले जाणार आहे.

Photos : माघी गणेशोत्सवाची लगबग, बाप्पाला सजवण्यात मूर्तीकार मग्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईमध्ये भाद्रपदातील गणेशोत्सव मंडळांची संख्या सुमारे १२ हजार आहे. त्या तुलनेत माघी गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या १५० ते २०० इतकीच असल्याची माहिती उपायुक्त रमाकांत बिरादार यांनी दिली. त्यामुळे काही विभागात केवळ एक दोन ठिकाणी उत्सव होत असतो. करोना व टाळेबंदीनंतरचे पहिले वर्ष म्हणून भाद्रपद गणेशोत्सव, नवरोत्रोत्सव यांना मंडप शुल्क माफ करण्यात आले होते. त्यामुळे यंदा माघी गणेशोत्सव मंडळांनाही दीडशे रुपये मंडप शुल्क माफ करण्यात आले असल्याचे बिरादार यांनी सांगितले. फक्त याच वर्षांपुरते माघी गणेशोत्सवादरम्यान उभारण्यात येणाऱ्या मंडपांसाठी शुल्क पूर्णपणे माफ करण्यास मंजुरी दिली आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.