scorecardresearch

मणि भवनची वाट पर्यटकांसाठी मोकळी !

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक केंद्र अशी ओळख असलेल्या आणि महात्मा गांधीजींच्या वास्तव्यामुळे वेगळे महत्त्व प्राप्त असलेल्या गावदेवी परिसरातील लॅबर्नम रोडवरील मणि भवनचे पर्यटकांना दर्शन घडावे यासाठी पालिकेने स्वतंत्र वाट मोकळी करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रसाद रावकर

मुंबई : भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक केंद्र अशी ओळख असलेल्या आणि महात्मा गांधीजींच्या वास्तव्यामुळे वेगळे महत्त्व प्राप्त असलेल्या गावदेवी परिसरातील लॅबर्नम रोडवरील मणि भवनचे पर्यटकांना दर्शन घडावे यासाठी पालिकेने स्वतंत्र वाट मोकळी करून देण्याचा निर्णय घेतला आहे. लॅबर्नम रोडवरील वर्दळ टाळून लगतच्या वापरात नसलेल्या छोटेखानी गल्लीचे सुशोभीकरण करून ती केवळ मणि भवनमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी खुली करण्याचा पालिकेचा मानस आहे. परिणामी, पर्यटकांना वर्दळ टाळून मणि भवनमध्ये जाणे शक्य होणार आहे. गावदेवी परिसरातील लॅबर्नम रोडवरील मणि भवन हे रेवाशंकर जगजीवन झावेर यांचे निवासस्थान. पारतंत्र्य काळात साधारण १९१७ ते १९३४ दरम्यान महात्मा गांधीजी याच वास्तूमध्ये वास्तव्यास होते. अनेक महत्त्वाच्या बैठका मणि भवनमध्ये होत होत्या. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीत मणि भवन केंद्र स्थानी होते. त्यामुळेच या वास्तूला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर मणि भवनचा ऐतिहासिक ठेवा जपण्यात आला आहे. महात्मा गांधीजींनी वापरलेल्या वस्तू येथे ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळेच दरवर्षी मोठय़ा संख्येने नागरिक मणि भवनला भेट देतात.

गावदेवी परिसरातील पंडिता रमाबाई मार्गावरून सुरू होऊन कृष्णा सांघी मार्गावर विलीन होणाऱ्या लॅबर्नम मार्गावर मणि भवन उभे आहे. लॅबर्नम मार्ग अरुंद असून तेथे वाहनांची वर्दळ सुरू असते. जवळच असलेली शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी या मार्गावर विद्यार्थी-पालकांची प्रचंड वर्दळ असते. या परिसरातील रहिवाशी आपल्या वाहनांनी या रस्त्यावरून जात असतात. तसेच मणि भवनला भेट देण्यासाठी पर्यटक वाहनांनी येतात. त्यामुळे वर्दळीत अधिकच भर पडले. ही बाब लक्षात घेऊन मणि भवनमध्ये जाण्यासाठी पर्यटकांना स्वतंत्र वाट मोकळी करून देण्याचा निर्णय पालिकेच्या ‘डी’ विभाग कार्यालयाने घेतला होता. या मार्गाचा स्थानिक रहिवाशांनाही वापर करता येणार आहे. त्यासाठी नवी योजना आखण्यात आली आहे.                

पंडिता रमाबाई मार्गावरून लॅबर्नम रोड आणि काशिबाई नवरंग मार्गादरम्यान एक छोटी गल्ली कृष्णा सांघी मार्गाला जाऊन मिळते. या गल्लीचा फारसा वापर होत नव्हता. लगतच्या गल्लीतील रहिवासी आपली वाहने उभी करण्यासाठी तिचा वापर करीत होते. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने मणि भवनमध्ये जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या गल्लीचे सुशोभीकरण करण्यात येणार असून स्वतंत्र प्रवेशद्वार, स्वातंत्र्य लढय़ातील घटनांची चित्रे, शिल्पांच्या माध्यमातून इतिहासाला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सध्या हा मार्ग काशिबाई नवरंग मार्गाजवळ बंद करण्यात आला आहे. तोही खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे आसपासच्या रहिवाशांनाही या मार्गाचा वापर करता येणार आहे. या मार्गाच्या सुशोभीकरणासाठी सुमारे ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.

लॅबर्नम मार्गावरील वाहनांची वर्दळ, विद्यार्थ्यांची लगबग लक्षात घेऊन मणि भवनमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वतंत्र वाट मोकळू करण्यात येणार आहे. सुशोभीकरणामुळे या रस्त्याचे सौदर्य वाढेल. तसेच या रस्त्याचा पर्यटकांबरोबरच स्थानिक रहिवाशांनाही वापर करता येईल.

– प्रशांत गायकवाड,  सहाय्यक आयुक्त डी विभाग

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mani bhavan open tourists mahatma gandhi ysh

ताज्या बातम्या