मुंबई : मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी शुक्रवापासून आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी सोमवारपासून पाणी पिणार नसल्याचे जाहीर केले आहे. जरांगे यांच्या आंदोलनात सामील होण्यासाठी कार्यकर्त्यांचा राज्यभरातून ओघ असून आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा जरांगे यांनी इरादा जाहीर केल्याने महायुती सरकारची कोंडी झाली आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा रविवारी तिसरा दिवस होता. . पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील कार्यकर्त्यांचा ओघ वाढला आहे. मुंबईत आलेल्या आंदोलकांची संख्या वाढू लागली आहे.
‘आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मुंबई सोडणार नाही. काय करायचे ते करा, आरक्षण घेणारच. माझे उपोषण उद्यापासून कडक राहणार आहे. उद्यापासून मी पाणी पिणे बंद करणार आहे. हे माझे आमरण उपोषण आहे,’ असे जरांगे यांनी जाहीर केले. कुणी दगडफेक करु नका. समाजाची मान खाली जाईल असे करु नका. मुंबईतले रस्ते अडवू नका. अन्नछत्राच्या नावावर पैसे गोळा करु नका. मी तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असे आवाहन जरांगे यांनी गावोगावच्या मराठा कार्यकर्त्यांना केले.
नेत्यांचा समाचार-
आंदोलनावर भाष्य करणाऱ्या नेत्यांचा जरांगे यांनी समाचार घेतला. ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे कुचक्या कानाचे आहेत. मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस घरी चहाला आले तरी खूश होतात. राज म्हणजे मानाला भुकेलेला पोरगा आहे. लोकसभा निवडणुकीत फडणवीसांनी त्यांचा गेम केला. राज यांना त्यांच्या पक्षाची फिकीर नाही. ते मराठवाड्यात कधी आलेले नाहीत. त्यांचा मुलगा फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीत पाडला. ते उगाच मराठ्यांच्या प्रश्नात पडतात, असे जरांगे यांनी ठाकरे यांना सुनावले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना मराठा आरक्षणातले काही कळत नाही. कुणबी पडताळणी याच चंद्रकांत पाटलांनी थांबवल्या होत्या. राज्याचे मत्स व्यवसाय मंत्री नितेश राणे ‘चिचुंद्री’ आहे. ते बोलतात पण कळत काही नाही. नितेश यांच्यविषयी नारायण राणे यांना कल्पना दिली होती. आंदोलन संपल्यावर नितेश राणे यांच्याकडे बघतो, असा इशारा जरांगे यांनी दिला. ठाकरे ब्रँड चांगला आहे, या शब्दात जरांगे यांनी उद्धव ठाकरे यांचे काैतुक केले.