मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीसाठी शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत आंदोलन सुरू करण्याचे जाहीर केले आहे. तर या आंदोलनाच्या दबावामुळे सरकारने मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देवू नये, यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने शनिवारपासून नागपूरमधील संविधान चौकात साखळी उपोषण करण्याचे व गरज पडल्यास मुंबईत आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राज्य सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे.

राज्य सरकारने जरांगे यांना शुक्रवारी एकच दिवस सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी दिली आहे. जास्तीत जास्त पाच हजार कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जाईल, यासह अनेक अटी पोलिसांनी घातल्या आहेत. मात्र जरांगे यांचा मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा निर्धार आहे. त्यांनी शिवनेरीहून मुंबईच्या दिशेने दुपारीच प्रयाण केले असून ते मध्यरात्रीपर्यंत मुंबईत पोचतील.

जरांगे यांनी आझाद मैदानावर ठिय्या मांडून बेमुदत आंदोलन सुरू केले, तर कोणती पावले उचलायची, त्यांची कार्यकर्त्यांची कुमक शुक्रवारी सायंकाळपर्यंत किती वाढेल, मराठा समाजाचा प्रतिसाद किती मिळेल, आदी बाबींनुसार त्यांच्या कार्यकर्त्यांना अन्य ठिकाणी आंदोलनाची परवानगी द्यायची, किंवा काय करायचे, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह खात्याचे अधिकारी, पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, पोलिस आयुक्त देवेन भारती आदींचा विचारविनिमय सुरू आहे. गणेशोत्सव व जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनास मुंबईकरांचा किती प्रतिसाद मिळतो आणि शुक्रवारची परिस्थिती पाहून सरकारकडून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. जरांगे यांनी बेमुदत आंदोलन सुरू केल्यास सरकार व पोलिसांची चांगलीच पंचाईत होणार आहे.