मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे शुक्रवारपासून आझाद मैदानावर आंदोलनाला बसले आहेत. त्यातच रविवारपासून त्यांनी पाणीही सोडले आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी १ वाजता डॉक्टरांच्या तुकडीने जरांगे यांची तपासणी केली. त्यावेळी त्यांची प्रकृती उत्तम असली तर त्यांचा रक्तदाब कमी झाला असून अशक्तपणाचा त्रास जाणवत आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण पुकारले आहे. ते २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा सोमवारी चौथा दिवस आहे. मागील तीन दिवसांपासून त्यांनी काहीही खाल्ले नाही. त्यातच रविवारपासून त्यांनी पाणीही सोडले आहे. त्यामुळे पोलिसांच्या सूचनेनुसार रविवारी मध्यरात्री १२ वाजता मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर सोमवारी दुपारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. अजय चंदनवाले यांच्या नेतृत्वाखाली चार डॉक्टरांच्या तुकडीने जरांगे यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांचे रक्तदाब व रक्तातील साखरेचे प्रमाण तपासले.
या तपासणीमध्ये जरांगे यांनी पाण्याचे सेवन करणेही सोडल्याने त्यांना अशक्तपणा आला असल्याचे निदर्शनास आले. तसेच त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी ८५ एमजी/डीएल इतकी कमी झाली असल्याचे सूत्राकडून सांगण्यात आले. मनोज जरांगे यांना जाणवत असलेला अशक्तपणा व त्यांनी पाण्याचे सेवन करण्याचेही सोडल्याने आत डॉक्टरांनी त्यांची संपूर्ण तपासणी करण्याचा सल्ला दिला आहे.
डॉक्टरांनी जरांगे यांच्या केलेल्या तपासणीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वैद्यकीय विभागाकडून सादर करण्यात आहे. मनोज जरांगे मागील चार दिवसांपासून आंदोलन करत आहेत. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाल्याशिवाय आपण मुंबई सोडणार नाही. उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. एक तर मी मरेन किंवा आरक्षण घेईन, अशी घोषणाच जरांगे यांनी केली आहे. त्यातच आता जरांगे यांना अशक्तपणाबरोबरच रक्तदाबाचाही त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती हळूहळू ढासळत असल्याने आझाद मैदानामध्ये जमलेल्या मराठा आंदोलकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
