Mumbai Crime ४३ वर्षांच्या एका मांत्रिकाला मुंबई पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंगाच्या आरोपांखाली अटक केली आहे. मुंबईतल्या गोरेगाव भागात एका ३७ वर्षीय महिलेवर या मांत्रिकाने बलात्कार केला. या प्रकरणात या मांत्रिकाला अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला या मांत्रिकाने तुझ्या नवऱ्याला आजारातून बरं करतो वगैरे सांगून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर नवऱ्याला आजारातून बरं करण्याच्या बहाण्याने या महिलेवर तीनवेळा बलात्कार केला. तू या गोष्टीची वाच्यता केलीस तर तुझ्या नवऱ्याला काळी जादू करुन मारुन टाकेन असंही या मांत्रिकाने धमकावलं होतं. आता पोलिसांनी या मांत्रिकाला अटक केली आहे.

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजाराम यादव नावाच्या मांत्रिकाने एका ३७ वर्षांच्या महिलेवर तीनपेक्षा जास्त वेळा बलात्कार केला. तसंच तिच्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंगही केला. या महिलेच्या पतीची प्रकृती जुलै २०२० पासून बिघडली आहे. त्याला बरं करतो, ठणठणीत करतो असं भासवून या राजाराम यादव नावाच्या आरोपीने महिलेवर बलात्कार केला.

राजाराम यादव असं आरोपीच नाव

राजाराम यादव हा स्वतःला मांत्रिक म्हणवतो, तसंच तो रिक्षाही चालवतो. ज्या महिलेवर बलात्कार केला त्या महिलेच्या पतीने त्याला आपल्याला बरं करण्यासाठी जुलै २०२० नंतर घरी बोलवलं होतं. घरी आल्यानंतर त्याने लसूण आणि काही फुलं घेऊन जादूटोणा केला. तुझ्या नवऱ्यावर उपचार करतो आहे असं त्याने या पीडित महिलेला सांगितलं.

महिलेवर तीनपेक्षा जास्तवेळा बलात्कार

ही घटना घडल्यानंतर काही आठवडे गेले. या दरम्यान पीडित महिलेला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर या राजाराम यादवला गावावरुन पुन्हा मुंबईत बोलवण्यात आलं. महिलेला गंभीर आजार झाला आहे. तिला बरं करायचं असेल तर काळी जादू करावी लागेल आणि तीनवेळा आपल्याशी शरीरसंबंध ठेवावा लागेल तरच हा आजार बरा होईल. यासाठी महिलेने नकार दिला. मात्र तिच्या पतीने तिला यासाठी तयार केलं. तसंच मांत्रिकाने हेदेखील सांगितलं की तुम्ही या आजाराचा वेळेवर उपाय केला नाही तर तो आजार बरा होणार नाही आणि त्याची लागण तुमच्या मुलींना होईल. त्यानंतर पीडिता कशीबशी तयार झाली. त्यावेळी मांत्रिकाने तिच्यावर तीनदा बलात्कार केला. त्यानंतरही शरीर संबंध ठेव अशी सक्ती तो तिला करु लागला. माझं ऐकलं नाहीस तर तुझ्या नवऱ्यावर काळी जादू करेन आणि त्याला ठार करेन असंही त्याने सांगितलं. या सगळ्याला कंटाळलेल्या पीडित महिला गावाला निघून गेली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन मुलींचा विनयभंग

यानंतर या मांत्रिकाने महिलेच्या नवऱ्याला सांगितलं की तुझी बायको गावाला निघून गेली आहे पण तुझ्या मुलींना तोच आजार झाला आहे. त्या दोघींना बरं करतो असं सांगून या मांत्रिकाने त्या दोघींना जंगलात नेलं आणि त्यांचा विनयभंग केला. या घटनेनंतर जेव्हा पोलिसांत तक्रार देण्यात आली तेव्हा या मांत्रिकाला अटक करण्यात आली. आरे पोलिसांनी ही माहिती दिली आहे.