मुंबई : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी नोकरदार वर्ग कार्यालयात जात असताना, बेस्टच्या बदललेल्या वेळापत्रकाचा सामना त्याला करावा लागला. मराठा आंदोलनामुळे बेस्टच्या २६ मार्गात बदल केला आहे. त्यामुळे प्रवासाच्या कालावधीत प्रचंड वाढ झाली. बेस्ट बस थांब्यावर बराच वेळ उभे राहून सुद्धा बस येत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यात पावसाची रिपरिप सुरू असल्याने, छत्री, बॅग हातात धरून बस थांब्यावर प्रतीक्षा करावी लागत आहे. तर, दुसरीकडे लोकल सेवा नियोजित वेळापत्रकाच्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्याह मागणीसाठी, मराठा आंदोलकांचे सलग चौथ्या दिवशी फोर्ट परिसरात आंदोलन सुरू असल्याने, बेस्ट बसच्या मार्गात बदल केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी जाण्यास अडथळा बनला आहे. मराठा आंदोलक सीएसएमटी परिसरात ठाण मांडून बसल्याने, वाहतूक पोलिसांनी अनेक मार्ग बंद केलेत. तसेच वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध केले आहेत. परंतु, सीएसएमटी परिसरात प्रचंड गर्दी झाल्याने, सर्व रस्ते आंदोलकांनी अडवून धरले आहेत. त्यामुळे बेस्ट बसची सेवा वळवण्यात आली आहे.
बेस्ट बस क्रमांक २४, ४५, सी-१०, ८६, ३०५ जगन्नाथ भोसले मार्गाऐवजी संत सेवालाल चौक – रामभाऊ साळसकर मार्ग – एम के मार्ग – पोद्दार चौक वळण घेऊन बस मार्गस्थ होत आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक १, २, ३, ६, ८, ५१, २५, ४५, सी-१०, १०३, १२४, १२६, ६९, १४ डी. एन. मार्गाऐवजी एमजी मार्गाने मेट्रो – एल.टी. मार्गाद्वारे वळवून क्रॉफर्ड मार्केट मार्गावरून जाईल. बेस्ट बस मार्ग क्रमांक ६६, ६९, १२६, २८ महापालिका मार्गाऐवजी एमजी मार्गाने हुतात्मा चौकाकडे बस वळवण्यात आली आहे. बेस्ट बस मार्ग क्रमांक १३८, १३९, ११५ डीएन मार्गाऐवजी शहीद भगतसिंग मार्गाने वळण घेऊन मार्गस्थ होत आहे.
मध्य रेल्वेवरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने
सोमवारी सकाळपासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहे. तर, हार्बर मार्गावरील आणि पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा ५ ते १० मिनिटे विलंबाने धावत होती.
मराठा समाज व्हाट्सअॅपवरून लोकलने प्रवास करणाऱ्या मराठा बांधवांसाठी सूचना दिल्या आहेत.
- कुणी ही रेल्वे मार्गावर खाली उतरू नये
- लोकलने बाहेर लटकून प्रवास करू नये
- मुंबई शहरातील नोकरदार वर्गाची गैरसोय होऊ नये, म्हणून सकाळी शक्यतो ५ ते ८ असा प्रवास करावा किंवा रात्री १० नंतर प्रवास करावा.
- सायंकाळी परतीचा प्रवास शक्यतो रात्री ८-९ नंतर करावा जेणेकरून मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग घरी पोहोचलेला असेल.