मुंबई : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून आरक्षण व अन्य मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदान परिसरात मराठा आंदोलकांची तुफान गर्दी झाली आहे. दुपारी मराठा आंदोलकांनी जेवण म्हणून सुका खाऊचा आधार घेतला असून बिस्कीटचे पुडे व फरसाणची पाकिटे घेण्यासाठी आंदोलकांची झुंबड उडाली होती.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. अनेकजण गटागटाने चारचाकी वाहने व टेम्पो घेऊन मुंबईत पोहोचले आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, आझाद मैदान आणि मुंबई महानगरपालिका मार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तसेच मराठा आंदोलकांनी जेवणाची स्वतःच व्यवस्था केली असून टेम्पोमधून जेवण बनविण्याचे साहित्य आणि बॅगा घेऊन मुंबई गाठली आहे. तर अनेकजण महिनाभराचा शिधा, भांडी असे सर्वच साहित्य सोबत आणले आहे.

बहुसंख्य मराठा आंदोलकांनी टेम्पोमध्येच खिचडी, तसेच चहा तयार केला. अनेकजण घरून आणलेली चटणी – भाकर खात होते. तर काहीजण मोठ्या प्रमाणात बिस्कीटचे पुडे व फरसाणची पाकिटे घेऊन आले आहेत. हा सुका खाऊ घेण्यासाठी मराठा आंदोलकांची झुंबड उडाली होती. पावसामुळे मराठा आंदोलकांची तारांबळ उडाली होती. परिणामी, आंदोलक विखुरले होते. अनेकजण रस्त्याच्या कडेला उभे राहून आणि छप्पराचा आडोसा घेऊन जेवत होते. मात्र या परिस्थितीतही आंदोलकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर हलगीच्या तालावर नाचत आंदोलक घोषणाबाजी करीत होते.

रेल्वे स्थानक व भुयारी मार्गात क्षणभर विश्रांती

मुंबईत दुपारी मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे मराठा आंदोलकांची तारांबळ उडाली. परिणामी आंदोलक विखुरले. अनेकांनी दुपारी क्षणभर विश्रांती घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक व भुयारी मार्गाचा आधार घेतला होता. सकाळपासून गर्दी उत्तरोत्तर वाढत असून रेल्वे स्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण झाले होते.