मुंबई- मराठा आंदोलनासाठी एका दिवसाची मुदत मिळाल्याने हजारो आंदोलकांनी रात्री मुंबईत मुक्काम केला. शुक्रवारची रात्र मुंबईतील रेल्वे स्थानक परिसर, फलाट, भुयारी मार्गात काढली. सोबत आणलेला शिधा खाल्ला. रात्री फलाटावरच हजारो आंदोलक विश्रांतीसाठी विसावले होते. शनिवारी देखील मुंबईत पाऊस सुरू झाल्याने आंदोलकांची गैरसोय होणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईच्या आझाद मैदानात उपोषण सुरू झाले आहे. या आंदोलनासाठी शुक्रवार सकाळ पासून हजारो आंदोलक मुंबईत दाखल झाले. किमान २५ हजारांहून अधिक आंदोलक आझाद मैदान परिसरात एकत्र जमले होते.

घोषणा देत, ढोल ताशांच्या गजरात नाचत कार्यकर्ते आंदोलन करत होते. परंतु दिवसभर पावसाची संततधार असल्याने आंदोलक दक्षिण मुंबई परिसरात विखुरले. शुक्रवारी सायंकाळी गर्दीने फुललेले आझाद मैदान रिकामे झाले होेते. या आंदोलनाला एक दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे आंदोलकांनी शुक्रवारची रात्र मुंबईतच काढली.

सीएसएमटी स्थानकात आश्रय

आझाद मैदानाला लागूनच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक आहे. रात्री आंदोलन संपल्यानंतर आंदोलकांनी रेल्वे स्थानकाचा ताबा घेतला. आंदोलनाला अनेक दिवस लागतील हे गृहीत धरून विविध जिल्ह्यातून आलेल्या आंदोलकांनी कोरडा शिधा आणला होता. टेम्पोमध्येच स्टोवर स्वयंपाकाची सोय करण्यात आली होती. त्यांच्यासाठी पाण्याच्या बाटल्या पुरविण्यात आल्या. रात्री भुयारी मार्गात जागा पटकावून सोबत आणलेलं जेवण केलं. पाऊस सुरू असल्याने रात्री जागा मिळेल तिथे आंंदोलक झोपले होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातील फलाट आणि परिसरात सर्वत्र कार्यकर्ते दिसत होते. सारा रेल्वे स्थानक परिसर या आंदोलकांनी व्यापून गेला होता.

सोय नसल्याने आंदोलकांचे हाल

या आंदोलनासाठी पोलिसांनी ५ हजार लोकांना परवानगी दिली होती. प्रत्यक्षात जास्त लोकं येतील याची कल्पना होती. मात्र त्या तुलनेत काहीच व्यवस्था केली नव्हती. फक्त आझाद मैदानात पाण्याचे टॅंकर आणि काही प्रमाणात फिरती शौचालये होती. त्यामुळे आंदोलकांना नैसर्गिक विधीसाठी रेल्वे स्थानकापासून, रस्त्याच्या आडोशाला आणि मैदानाच्या कडेचा आधार घ्यावा लागला होता. त्यात पाऊस पडत असल्याने चिखल आणि दुर्गंधी पसरली. त्यानंतर सायंकाळी आझाद मैदानाच्या मेट्रो स्थानक परिसरात १२ फिरत्या शौचालयांची सोय करण्यात आली होती. मैदानात चिखल झाल्याने खडी टाकण्यात आली. गैरसोय होत असली तरी कार्यकर्त्यांचा उत्साह कायम होता. सरकारने आमच्यासमोर कितीही अडचणी उभ्या केल्या तरी आम्ही मागे हटणार नाही, असा निर्धार आंदोलकांनी यावेळी व्यक्त केला.

शहरी मराठ्यांची आंदोलनाकडे पाठ

आझाद मैदानात राज्याच्या विविध जिल्ह्यातून आंदोलक हजारोंच्या संख्येने आले होते. प्रचंड गर्दी आणि पावसामुळे गैरसोय झाली होती. परंतु त्याची पर्वा न करता ते आंदोलन करत होते. मात्र मुंबईतील शहरी मराठा समाजाने या आंदोलनापासून दूर राहणेच पसंत केले. मराठा आरक्षणाची मक्तेदारी काय फक्त ग्रामीण भागातील गरिब मराठ्यांनीच घेतली आहे का? असा प्रश्न एका आंदोलकाने उपस्थित केला.