मुंबई : राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्यात आल्यानंतर ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आलेल्या मराठीच्या मराठीच्या विजयी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी कार्यकर्त्यांमधील उत्साहाला उधाण आले होते.
कोणी मराठीशी संबंधित विविध मजकूर लिहिलेले तसेच बाराखडी असलेले टी-शर्ट घालून आले होते,५ तर कोणी डोक्यावर ‘मी मराठी’ लिहिलेली टोपी घालून आले होते. मनसेचे पालघरमधील कार्यकर्ते तुलसी जोशी हे आपल्या सहकाऱ्यांसह थेट महाराष्ट्रद्रोही यमाला घेऊन पोहोचले आणि सर्वांच्या नजरा त्यांच्या चमूकडे वळल्या.
दरम्यान, तुलसी जोशी यांच्या एका सहकाऱ्याने राज ठाकरेंचा आणि दुसऱ्या सहकाऱ्याने उद्धव ठाकरेंचा मुखवटा घालून वेशभूषा केली होती. या तिघांच्या हातात चाबूक होता आणि तिघेही मिळून महाराष्ट्रद्रोही यम बनविलेल्या व्यक्तीच्या समोर चाबूक उगारत होते. त्यानंतर राज आणि उद्धव ठाकरेंच्या वेशभूषेतील कार्यकर्ते हात हातात घेऊन उभे होते. इतर कार्यकर्त्यांच्या हातात महाराष्ट्रात चुकीला माफी नाही अशा आशयाचे फलक होते. तसेच हीच मुंबई तुम्हाला घडवते, शिकून होता कर्ते – धर्ते, माज नको दाखवू नाहीतर महाग पडेल तुला सदावर्ते अशा आशयाचा फलक हाती घेऊन गुणरत्न सदावर्ते यांना इशारा देऊन डिवचण्यात आले.
या फलकावर हातात चाबूक घेऊन गुणरत्न सदावर्ते यांच्या मागे धावणारी मराठी माणसे आणि हातात चाबूक घेऊन महाराष्ट्रद्रोही व्यक्तीच्या मागे धावणारे राज आणि उद्धव ठाकरे, असे व्यंगचित्रही होते. त्यामुळे वरळीतील एनएससीआय डोम येथे राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिकांचे तुलसी जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडे लक्ष वेधले जात होते. हे कार्यकर्ते सुरुवातीला सकाळी दादर परिसरात दाखल झाले होते. तेथे निदर्शने करताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांनी सोडल्यानंतर त्यांनी वरळीतील एनएससीआय डोम गाठले.
‘गुणरत्न सदावर्ते यांच्यासारखा माणसांना माज चढला आहे. हे सर्वजण मिळून मराठी माणूस आणि ठाकरे कुटुंबाच्या मागे लागले आहेत. त्रिमूर्ती सरकारने महाराष्ट्राचे वाटोळे केले आहे. त्यामुळे राज आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले, तर महाराष्ट्र वाचेल. तसेच महाराष्ट्रात राहून मराठीच्या विरोधात बोलणाऱ्यांचा माज उतरविला जाईल, ठाकरे परिवाराकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल’, असे तुलसी जोशी यांनी सांगितले.