वाऱ्यांच्या प्रवाह बदलाचा परिणाम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर मोठय़ा प्रमाणात मासे वाहून येत असतानाच मुंबई किनारपट्टीवरही कोळंबी, जेली फिश आणि पाकट (स्टिंग रे) जातीचे मासे येण्याचे प्रमाण वाढले आहे. वातावरणातील बदल वा सागरी प्रदूषणाशी याचा संबंध नाही. मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला की समुद्रातील पाण्याचा प्रवाह बदलतो. या कारणामुळे अनेक सागरी जीव किनाऱ्याला लागत असल्याच्या घटना घडतात, असे निरीक्षण सागरी परिसंस्थेच्या अभ्यासकांनी नोंदविले. दरवर्षी कमीअधिक प्रमाणात हा प्रकार घडतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जल प्रदूषणामुळे किंवा वातावरणातील बदलामुळे अलिबागच्या किनाऱ्यालगत मोठय़ा संख्येने सागरी जीव आल्याचे संदेश समाजमाध्यमांवर गेले काही दिवस फिरत आहेत. गेल्या काही दिवसांत वरळी, गिरगाव आणि दादर चौपाटी किनाऱ्यालगतही कोळंबी आणि जेलीफिश मोठय़ा संख्येने येत आहेत.

दादर किनारा स्वच्छ करतेवेळी आकाराने साधारणपणे अडीच फूट असलेल्या जेलीफिश सापडत असल्याची माहिती येथील रहिवासी जय श्रुंगारपुरे यांनी दिली. यासारखीच परिस्थिती गिरगाव चौपाटीवर असून जिवंत स्टिंग रे आणि कोळंबी किनाऱ्याला लागत असल्याचे सागरी निरीक्षक प्रदीप पाताडे यांनी सांगितले. वरळीच्या किनाऱ्यावरही कोळंबी मोठय़ा संख्येने येत असल्याचे मच्छीमार राम तांडेल यांनी सांगितले. मात्र हा परिणाम समुद्रातील अंतर्गत भागात होणाऱ्या बदलाचा असल्याचे सागरी जीवतज्ज्ञ सांगत आहेत. या काळात समुद्राच्या पाण्याचा रंगही बदलतो. त्याला स्थानिक कोळी ‘सारगीचे पाणी’ म्हणतात.

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात मोसमी वाऱ्यांच्या परतीचा प्रवास सुरू झाला की ते वारे सागराच्या पोटात असलेल्या ऑक्सिजनच्या थराला ढकलण्यास सुरुवात करतात.

त्यामुळे पाण्याचे फुगवटे तयार होतात, असे ‘सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिटय़ूट’चे माजी संशोधक डॉ. विनय देशमुख यांनी सांगितले. या फुगवटय़ांमुळे दक्षिणेकडे जाणारा प्रवाह तयार होतो व समुद्राच्या खोल तळातील पाणी वर येते आणि त्याबरोबरीनेच किमान ऑक्सिजनचा थरही वरच्या बाजूस येतो.

ऑक्सिजनची कमतरताया

थरामध्ये ज्यावेळी सागरी जीव येतात त्यावेळी त्यांना ऑक्सिजनच्या कमतरतेने श्वसनाचा त्रास होतो व त्यांचा मृत्यू होऊन ते किनाऱ्याला येतात. या बदलाला सागरी प्रदूषण कारणीभूत नसून हा प्रकार दरवर्षीच घडतो. फक्त त्याचे प्रमाण कमी-जास्त असते, असेही ते म्हणाले.याशिवाय स्टिंग रे यांचा हा प्रजननाचा काळ असल्याने ते देखील किनाऱ्यावर येण्याचे प्रमाण वाढते, असे सागरी निरीक्षक व अभ्यासक प्रदीप पाताडे यांनी सांगितले. अलिबागच्या प्रकरणानंतर या संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास करण्यात आला. मुंबई ते रायगड भागातील किनारपट्टीवर कमी ऑक्सिजनचा पट्टा निर्माण झाल्याने हा प्रकार घडल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marine creatures coming to shore
First published on: 13-10-2017 at 02:58 IST