मुंबई : भायखळा येथील मोतीशाह लेन येथील सुपर बेकरीमध्ये सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण दुर्घटनेत बेकरी मालक, त्यांचा मुलगा आणि कामगार असे मिळून एकूण चारजण होरपळले आहेत. सद्यस्थितीत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भायखळ्यात सुपर बेकरीत सोमवारी सायंकाळी स्वयंपाकाच्या सिलिंडरमधून गॅस गळती सुरु झाली. संबंधित बाब दुकानातील कामगारांच्या पटकन लक्षात आली नाही. गॅसगळती होताच बेकरीत आगीचा भडका उसळला. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मदतकार्य हाती घेतले.

आग आणि धुरामुळे अग्निशामकांना आग नियंत्रणात आणण्यात अडचणी येत होत्या. आगीची वाढती तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने सायंकाळी ५ वाजून २७ मिनिटांनी आग भीषण स्वरूपाची (क्रमांक एकची वर्दी) असल्याचे घोषित केले. बेकरीत अचानक झालेल्या भडक्यामुळे कामगारांना बेकरीतून बाहेर पडण्यासाठी वेळ मिळाला नाही. त्यामुळे आगीत जयेश पारेख (४६), जुबेर सिद्दीकी (२५), जावेद मोहम्मद (२३), शारीअर रैसी (३६) हे चारजण जखमी झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढून उपचारासाठी नजीकच्या मसीना रुग्णालयात दाखल केले. शर्थीचे प्रयत्न करून ६ वाजून ४० मिनिटांनी आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

आगीमुळे जयेश पारेख यांचे शरीर २५ ते ३० टक्के भाजले होते. जयेश आणि शारीअर यांना पुढील उपचारासाठी भाटिया रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आले. जुबेर आणि जावेद यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अंधेरी येथील लोखंडवाला परिसरातही शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली होती. त्या दुर्घटनेत ३४ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. तसेच एकूण सहाजण जखमी झाले होते. जखमींमध्ये तीन वर्ष आणि दहा दिवसांच्या चिमुकल्यांचाही समावेश होता. त्यापूर्वी गेल्या आठवड्यात मानखुर्द येथील मंडाळा परिसरात गॅस गळतीमुळे आग लागली होती. त्या दुर्घटनेतही आईसह मुलीचा मृत्यू झाला होता.