-संदीप आचार्य

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात करोनाकाळातही माता व बाल आरोग्याची जास्तीत जास्त काळजी घेण्यात येत असल्याने राज्यात तसेच मेळघाटमध्ये माता व बालमृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. २०१६-१७ मध्ये मेळघाटमध्ये ४०७ बालमृत्यूंची नोंद होती ती २०२०- २१ मध्ये कमी होऊन २१३ बालमृत्यू झाले तर दर लाख मातांमागे ८६ हे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन ४६ माता मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

मेळघाट मधील माता व बालमृत्यू हा कायमच ऐरणीवरील विषय राहिला आहे. मेळघाटमधील सामाजिक कार्यकर्ते बंडू साने हा विषय पराकोटीच्या पोटतिडकीने सातत्याने सरकारदरबारी तसेच न्यायालयात मांडत असतात. याचाच परिणाम म्हणा किंवा आरोग्य विभागाची सतर्कता म्हणा अमरावतीमधील मेळघाटसह संबधित भागात आरोग्य विभागाकडून माता व बालमृत्यू रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सातत्याने केल्या जात आहेत. यातूनच २०१६-१७ साली ० ते १ वयोगटातील २८० अर्भक मृत्यूंचे प्रमाण कमी होऊन जुलै २०२०- २१मध्ये १७२ अर्भक मृत्यू झाले तर १ ते ६ वयोगटातील ४०७ बालकांच्या मृत्यूची असलेली संख्या कमी होऊन २१३ एवढी झाली. ‘एसआरएस’च्या अहवालानुसार अर्भक मृत्यूदराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे तर माता मृत्यूच्या प्रमाणात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने उपाययोजना करण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाच्या संचालक डॉ अर्चना पाटील यांनी सांगितले.

अमरावतीमध्ये धारणी व चिखलदरा हे दोन तालुके आदिवासी क्षेत्रात येत असून यातील मेळघाट भागात एक उपजिल्हा रुग्णालय, दोन ग्रामीण रुग्णालय, ११ प्राथमिक आरोग्य केंद्र, ९२ उपकेंद्रे, ७ फिरती आरोग्य पथके, ६ प्राथमिक आरोग्य पथके, २२ भरारी पथके तसेच एक अॅलोपथी व ४ आयुर्वेदिक दवाखाने, ४८३ अंगणवाडी केंद्र आणि १०८ टोल फ्री क्रमांकाच्या सहा रुग्णवाहिका कार्यरत असल्याचे डॉ अर्चना पाटील यांनी सांगितले.

याशिवाय मेळघाटमध्ये विशेष नवजात काळजी कक्ष, नवजात शिशु स्थिरीकरण कक्ष, पोषण पुनर्वसन केंद्र, बालमृत्यू अन्वेषण, घरच्याघरी बालकांची काळजी योजना राबविली जात आहे. यातील पोषण पुनर्वसन केंद्रात २०२०- २१ मध्ये ३०६ बालकांना दाखल करण्यात आले आहे तर २३ बाल उपचार केंद्रात १०५ कुपोषित बालकांना याच काळात दाखल करून उपचार करण्यात आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत मध्यम कमी वजनाची व तीव्र कमी वजनाच्या बालकांच्या प्रमाणातही घट झाली आहे. गेल्या वर्षी मध्यम कमी वजनाची अमरावती जिल्ह्यात २३,२२९ बालके होती ती कमी होऊन जून २०२१ अखेरीस २०,६७८ एवढी झाली तर तीव्र कमी वजनाच्या ५३९७ बालकांची संख्या वेगवेगळ्या उपाययोजनांमुळे कमी होऊन ४७९४ एवढी झाल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

प्रामुख्याने करोनाकाळातही महिला व बाल विकास विभागाने मेळघाटसाठी बाल आरोग्यासाठी २०७ वेळा ऑनलाईन आढावा बैठका घेतल्या आहेत. मेळघाटसाठी केवळ माता व बाल आरोग्याचा विचार करून ९ अत्याधुनिक रुग्णवाहिका, तीन मोटर बाईक रुग्णवाहिका, ११ प्राथमिक आरोग्य केंद्रात सुसज्ज प्रसुतीगृहे , पुरेशी औषधे तसेच नवजात बालकांसाठी ऑक्सिजन कॉन्सट्रेटर, ३८५० हायपोथर्मियी किट आदी पुरविण्यात आले असून वैद्यकीय अधिकार्यांपासून आरोग्य सेवकांपर्यंत जवळपास सर्व पदे भरण्यात आली आहेत. याशिवाय कंत्राटी स्त्रीरोगतज्ज्ञ व बालरोगतज्ज्ञांचीही नियुक्ती करण्यात आल्याचे डॉ अर्चना पाटील यांनी सांगितले.

केवळ मेळघाटच नव्हे तर राज्यातील सर्व आदिवासी जिल्ह्यातील माता व बाल आरोग्याची करोनाकाळातही विशेष काळजी घेण्याचे काम आरोग्य विभागाकडून करण्यात येत असल्याचे तसेच या कामाचा नियमित आढावा घेण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maternal and child mortality rate reduced in the state and melghat srk
First published on: 07-09-2021 at 12:14 IST