मालाडमधील क्रीडा संकुलाला टीपू सुलतानचे नाव देण्याचा वाद संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. मुंबईतील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करु नका असा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपाला दिला आहे. बुधवारी क्रीडा संकुलाला टीपू सुलतानचे नाव देण्यावरुन मालाडमध्ये भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. यावेळी खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार अतुल भातखळकर आंदोलनासाठी उपस्थित होते. त्यानंतर गोंधळामध्येच पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन झाले. यावरून आता भाजपा आक्रमक झाली असून महाराष्ट्रभर यासंदर्भात आंदोलनचे लोण पसरणार असल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. त्यानंतर आता महापौर किशोरी पेडणेकर आक्रमक झाल्या असून मुंबईतील कायदा सुवव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करु नका असा इशारा दिला आहे.

“कालचा अख्खा दिवस कायदा सुव्यस्था बिघडवण्याचा होता. ज्यांनी यामध्ये कालच्या आंदोलनात उड्या मारल्या त्यांनी आधी, तुमचा विरोध २०१९ पासून सुरु आहे का याचे उत्तर द्यावे. आत्ताच या नावाला विरोध का होत आहे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा आहेत म्हणून मूळव्याध सतत सतवतो आहे का माझा प्रश्न आहे. आज मुंबईत दोन वर्षे करोनामध्ये सर्वच लोक होरपळून निघालो आहोत. त्यानंतर आता असे प्रकार सुरु आहेत. एक माजी आमदार दंगल होणार असे म्हणत आहे. दंगल कुणाला हवीय आणि करुन तर दाखवा. या मैदानाला नाव देण्याचा महापालिकेसोबत आणि आत्ताच्या राज्य सरकारसोबत संबंध नाही. आमच्याकडे असा कुठलाही प्रस्ताव नाही त्यामुळे साप म्हणून दोरी आपटण्याचे काम भाजपाकडून सुरु आहे. या वादामध्ये सतत शिवसेनेला खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुंबई अस्थिर करण्याच्या कामामध्ये वेळ घालवण्यापेक्षा तुम्ही विकास कामांकडे बघा. मी पुरावे देत आहे आणि ते खोटे वाटत असतील तर तुम्ही ते सिद्ध करा,” असे आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.

“याकूब मेमनला सोडवण्याची मागणी करणाऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार”; अस्लम शेख यांच्यावर भाजपा खासदाराची टीका

क्रीडा संकुलाला दिलेले नाव महापालिकेच्या अधिकृत पटलावर अद्याप नाही

“मुंबईमध्ये भाजपाच्या अध्यक्षतेखाली दोन रस्त्यांना नावे देण्यात आली होती. मुंबईची शांती कोणाला बिघडवायची आहे आणि कोणाला दंगल हवी आहे? एका नावावरुन एवढा मोठा वाद निर्माण करण्यात आला आहे. त्या नावाला अजून मान्यताच  दिलेली नाही किंवा दिली जाईल. झाशीची राणी लक्ष्मीबाई नाव देण्याची मागणी आमची आहे. त्या विभागातील नगरसेवकाला कोणते नाव द्यायचे हा अधिकार आहे. ते नाव नागरिक सुचवतात असा आत्तापर्यंतचा नियम आहे. आम्ही सुचवलेल्या नावावर एक शब्दही बोलला जात नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकनाथ खडसेंच्या पत्रामध्ये वीर टीपू सुलतान क्रीडांगण असा उल्लेख आहे. क्रीडा संकुलाला दिलेले नाव महापालिकेच्या अधिकृत पटलावर अद्याप नाही,” असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

“मी धमकी देत नाही पण…”; क्रीडा संकुलाच्या नामांतरणावरुन चंद्रकांत पाटलांचा इशारा

खोटी कामे करणे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले नाही

“मुंबईमध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम भाजपा का करत आहे हा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे. सभावृत्तांत हा आमच्या घरी नसतो. त्यामध्ये खाडाखोड झाल्याचे वाटत असेल तर नक्की त्याची शहानिशा करा आणि त्यासाठी मी पाठपुरावा करेन. खोटी कामे करणे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवले नाही. त्यामुळे कितीही प्रसंग आला तरी आम्हीच खरंच बोलत राहणार. पण मुंबईच्या नागरिकांना अस्थिर करण्याचे काम करु नका आणि करायचीच असेल तर मैदानात या,” असा इशारा किशोरी पेडणेकरांनी दिला आहे.