मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘वडाळा – ठाणे – कासारवडवली मेट्रो ४’ आणि ‘कासारवडवली – गायमुख मेट्रो ४ अ’ मार्गिका मोघरपाडा कारशेडला जोडण्याच्या कामाला महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) मान्यता दिली आहे. आता एमएमआरडीएला पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडून यासंबंधीच्या प्रस्तावाला मान्यता घ्यावी लागणार आहे. ही मान्यता मिळाल्यानंतर २० खांबांच्या उभारणीच्या कामाचा मार्ग मोकळा होईल.
एमएमआरडीएच्या १४ मेट्रो प्रकल्पातील अत्यंत महत्त्वाचा, मुंबई आणि ठाण्याला जोडणारा मेट्रो प्रकल्प म्हणून ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’कडे पाहिले जाते. या मेट्रो मार्गिकांची कामे सध्या वेगात सुरू आहेत. ‘मेट्रो ४’ मार्गिका ३२.३२ किमी, तर ‘मेट्रो ४ अ’ मार्गिका २.७ किमी लांबीची आहे. या मार्गिकेतील गायमुख – विजय गार्डन दरम्यानच्या ४.४ किमी लांबीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण डिसेंबरमध्ये करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
कारशेडसाठी पर्यायी व्यवस्था करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाणार आहे. त्यानुसार या टप्प्यावरील चाचण्यांना सुरुवात झाली आहे. ही मार्गिका टप्प्याटप्प्याने पुढे वाहतूक सेवेत दाखल केली जाणार आहे. दरम्यान, पहिला टप्पा सेवेत दाखल करण्याची तयारी सुरू आहे. मात्र या मार्गिकेतील मोघरपाडा कारशेडचे काम पूर्ण होणे बाकी आहे. या मार्गिकेतील कारशेड ठाण्यातील मोघरपाडा येथे बांधण्यात येणार आहे. मात्र जागेच्या वादामुळे कारशेड रखडली होती. शेवटी वाद निकाली काढून जागा ताब्यात घेण्यात एमएमआरडीएला यश आले आहे. काही महिन्यांपूर्वीच कंत्राटदाराने कारशेडच्या प्राथमिक कामाला सुरुवात केली असून ही कारशेड पूर्ण होण्यासाठी आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे. कारशेड आणि मेट्रो मार्गिका जोडण्याच्या मार्गासाठी खाडीत २० खांब बांधण्याच्या कामाला एमसीझेडएमएकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे.
प्रस्तावित मोघरपाडा कारशेड किनारपट्टी नियमन क्षेत्राच्या बाहेर आहे. ही कारशेड नजीकच्या २०० मीटर अंतरावरील ४० मीटर रुंद रस्त्याला जोडण्यासाठी २५ मीटर खांब उभारावे लागणार आहेत. हे खांब २० मीटर रुंद नाल्यावरून जाणार असून हा नाला किनारपट्टी नियमन क्षेत्रात येतो. त्यामुळे खाडीत २० खांबांची उभारणी करण्यासाठी मान्यता मिळण्यासंबंधीचा प्रस्ताव एमसीझेडएमएला पाठवण्यात आला होता. एमसीझेडएमएने या प्रस्तावाला नुकतीच मान्यता दिली. ही मान्यता मिळाल्यानंतर आता एमएमआरडीए पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाकडे पर्यावरणसंबंधीच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणार आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर २० खांबांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा होणार आहे.
