मुंबई : वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला लागलेले विलंबाचे शुक्लकाष्ठ तिसऱ्या फेरीमध्येही कायम राहिले आहे. वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाच्या पहिली फेरी व दुसरी फेरीला झालेल्या विलंबानंतर आता तिसरी फेरीही लांबणीवर टाकण्यात आली आहे. अखिल भारतीय कोट्याची तिसरी फेरी २९ सप्टेंबर, तर राज्य कोट्याची तिसरी फेरी १० ऑक्टोबरला सुरू होणे अपेक्षित असतानाही अद्यापपर्यंत फेरी सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

वैद्यकीय व दंत पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रकियेचे वेळापत्रक राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगातंर्गत असलेल्या वैद्यकीय समुपदेशन समितीमार्फत (एमसीसी) जाहीर करण्यात येते. यंदा नीट यूजी परीक्षाचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यास एमसीसीकडून विलंब झाला. मात्र प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आता पुढील फेऱ्या सुरळीत पार पडतील अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना असताना नव्याने सुरू होणारी महाविद्यालये व वाढीव जागा मंजुरीच्या प्रस्तावामुळे दुसरी फेरीही लांबणीवर टाकण्यात आली होती. पहिली फेरी संपल्यानंतर तब्बल एक महिन्यानंतर दुसरी फेरी सुरू करण्यात आली होती. या विलंबामुळे विद्यार्थी चिंतीत झाले आहेत. अखेर एमसीसीने दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला. त्यानंतर अखिल भारतीय कोट्याची तिसरी फेरी २९ सप्टेंबर, तर राज्य कोट्याची तिसरी फेरी १० ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता होती. मात्र एमसीसीकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले नसल्याने आता तिसरी फेरीही लांबणीवर पडली आहे.

वैद्यकीय व दंत अभ्यासक्रमाला झालेले प्रवेश

राज्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या ८ हजार ३०५ जागा असून, पहिल्या फेरीमध्ये ६ हजार ८४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये ४ हजार ४१७, तर खासगी महाविद्यालयांमध्ये २ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तसेच दुसऱ्या फेरीमध्ये ८५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये ३८१, तर खासगी महाविद्यालयांमध्ये ४७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तिसऱ्या फेरीसाठी ६०६ जागा रिक्त आहेत. त्याचप्रमाणे दंत अभ्यासक्रमाच्या २ हजार ७१८ जागांपैकी पहिल्या फेरीमध्ये फक्त ९६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये १७१, तर खासगी महाविद्यालयांमध्ये ७९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दुसऱ्या फेरीमध्ये ८६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यामध्ये शासकीय महाविद्यालयामध्ये ९४, तर खासगी महाविद्यालयांमध्ये ७७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. तिसऱ्या फेरीसाठी ८९१ जागा रिक्त आहेत.