मुंबई : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची दुसरी फेरी २ ऑक्टोबर रोजी संपुष्टात आली. मात्र पहिल्या फेरीच्या तुलनेत दुसऱ्या फेरीला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले. पहिल्या फेरीत वैद्यकीय अभ्यासक्रमाला ६ हजार ८४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. तर दुसऱ्या फेरीमध्ये अवघे ८५१ विद्यार्थांनी प्रवेश घेतले असून, तिसऱ्या फेरीसाठी ६३६ जागा रिक्त राहिल्या आहेत.

राज्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीसाठी उपलब्ध असलेल्या ८ हजार १३८ जागांवर ६ हजार ८४८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यामुळे दुसऱ्या फेरीसाठी १ हजार २९० जागा रिक्त राहिल्या होत्या. मात्र दुसऱ्या फेरीपूर्वी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाअंतर्गत असलेल्या वैद्यकीय समुपदेशन समितीने राज्यामध्ये खासगी व सरकारी महाविद्यालयांतर्गत २०० जागांना मान्यता दिली. त्यामुळे दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेशासाठी १ हजार ४९० जागा उपलब्ध झाल्या होत्या. वैद्यकीय अभ्यासक्रमाची दुसरी फेरी २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आली. या फेरीअंतर्गत राज्यामध्ये वैद्यकीय अभ्यासक्रमाला फक्त ८५१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. यामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये ३८१, तर खासगी महाविद्यालयांमध्ये ४७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.

 तसेच ५४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले. यामध्ये सरकारी महाविद्यालयांमध्ये ८६, तर खासगी महाविद्यालयामध्ये ४६३ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले. दुसऱ्या फेरीदरम्यान ११ विद्यार्थ्यांनी घेतलेले प्रवेश रद्द केले. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमााच्या तिसऱ्या फेरीसाठी ६३६ जागा रिक्त राहिल्या असून, यामध्ये खासगी महाविद्यालयांमध्ये ४६८, तर सरकारी महाविद्यालयांमध्ये १६८ जागा रिक्त राहिल्या आहेत. वैद्यकीय अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीमध्ये चांगला प्रतिसाद दिला असला तरी दुसऱ्या फेरीमध्ये अल्प प्रतिसाद मिळाल्याचे निदर्शनास आले आहे.

दंत अभ्यासक्रमाच्या ८९१ जागा रिक्त

दंत अभ्यासक्रमाला पहिल्या फेरीप्रमाणेच प्रतिसाद मिळाला. दंत अभ्यासक्रमाच्या पहिल्या फेरीमध्ये ९६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. दुसऱ्या फेरीमध्ये ८६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यामध्ये शासकीय महाविद्यालयामध्ये ९४, तर खासगी महाविद्यालयांमध्ये ७७२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दुसऱ्या फेरीमध्ये ८५२ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले होते. यामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये ४२ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ८१० विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारले. तर १७ विद्यार्थ्यांनी प्रवेश रद्द केले आहेत. यामुळे दंत अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीसाठी ८९१ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये खासगी महाविद्यालयांमध्ये ८३८, तर सरकारी महाविद्यालयांमध्ये ५३ जागा रिक्त राहिल्या आहेत. दरवर्षी दंत अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी असला तरी अखेरच्या फेरीपर्यंत बहुतांश जागांवर प्रवेश होत असल्याचे निदर्शनास आले आहे.