मुंबई : राज्यातील निवासी डॉक्टर हे रुग्णसेवेचे महत्वाचे काम करतात. निवासी डॉक्टरांची सुरक्षा आणि त्यांच्या राहण्याची उत्तम सोय होणे महत्वाचे आहे. यासाठी महाविद्यालये आणि रुग्णालयांमध्ये त्यांना आवश्यक सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशा सूचना वैद्याकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.

मंत्रालयातील दालनात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड)च्या विविध प्रश्नांबाबत बैठक झाली. बैठकीस वैद्याकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, वैद्याकीय शिक्षणचे संचालक डॉ. अजय चंदनवाले, उपसचिव तुषार पवार, शंकर जाधव आदी उपस्थित होते.

प्रलंबित महागाई भत्त्यावरही निर्णय लवकरच

निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृहाची सुविधा करावी. नवीन वसतिगृहे बांधकामांबाबत प्रस्ताव सादर करावेत. काही ठिकाणी वसतिगृहासाठी भाडेतत्वावर इमारती उपलब्ध करून घ्याव्यात. ज्या डॉक्टरांची वसतिगृहात निवासव्यवस्था होत नाही, अशा डॉक्टरांना घरभाडे भत्ता देण्याबाबत सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश मुश्रीफ यांनी दिले. निवासी डॉक्टरांना प्रलंबित महागाई भत्ता देण्यासंदर्भात महाविद्यालय स्तरावरून माहिती घेऊन याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवासी डॉक्टरांची सुरक्षा महत्त्वाची असल्याने सुरक्षेसाठी रुग्णालयांमध्ये अलार्म सिस्टीम आणि सीसीटीव्ही बसविण्यात यावेत. रुग्ण कक्षाशेजारी साईड रुम, महाविद्यालय व रुग्णालयात स्वतंत्र पोलिस चौकी सुरू करण्याबाबत गृह विभागासोबत समन्वय साधून त्याचा पाठपुरावा करावा. डॉक्टरांना मूलभूत सुविधा देऊन त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात यावा.
-हसन मुश्रीफ, वैद्याकीय शिक्षण मंत्री