मध्य रेल्वेचे वेळापत्रक १० दिवसांत रूळांवर आणावे, अशी सूचना दस्तुरखुद्द रेल्वेमंत्र्यांनी करून २४ तास उलटत नाहीत, तोच रविवारी मुलुंड आणि नाहूर स्थानकांदरम्यान एका गाडीच्या डब्यात तांत्रिक बिघाड झाला. यामुळे गाडय़ा अर्धा तास उशिराने धावत होत्या.
  आधीच मेगाब्लॉकमुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांना बिघाडामुळे चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. संध्याकाळी साडेचारच्या सुमारास झालेला हा बिघाड अध्र्या तासानंतर दुरुस्त करून गाडी भायखळा येथील सायिडगमध्ये रवाना करण्यात आली.
खोपोलीहून मुंबईकडे जाणारी जलद गाडी रविवारी सायंकाळी मुलुंड स्थानकापुढे अचानक बंद पडली. या गाडीच्या डब्यात बिघाड झाल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. सकाळी ११ पासून ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सुरू असलेल्या मेगाब्लॉकच्या कामांमुळे प्रवाशांना हाल सहन करावे लागले होते. त्यातच मेगाब्लॉक संपण्याच्या वेळीच हा बिघाड झाल्याने लोकांच्या हालअपेष्टांमध्ये भरच पडली.
या बिघाडानंतर अप जलद मार्गावरील गाडय़ा मुलुंड ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावरून वळवण्यात आल्या. परिणामी दोन्ही मार्गावरील गाडय़ा सुमारे अर्धा तास उशिराने धावत होत्या. दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास ही गाडी कुर्ला स्थानकात आणून रद्द केली. त्यानंतर ही गाडी भायखळा येथील सायिडगमध्ये पाठवण्यात आली.