मुंबई : भर उन्हात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल टीकेचे धनी बनलेल्या राज्य सरकारने याबद्दल श्री सदस्यांकडे बोट दाखवले आहे. धर्माधिकारी यांच्या श्री सदस्यांनी आग्रह केल्यामुळेच हा कार्यक्रम सकाळी आयोजित करावा लागला, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. खारघर येथे आयोजित करण्यात आलेला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळय़ाची वेळ संध्याकाळची निश्चित करण्यात आली होती. मात्र श्रीसदस्यांच्या आग्रहाखातरच हा कार्यक्रम सकाळच्या सत्रात- भर उन्हात आयोजित  करण्यात आल्याचा दावा रायगडचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला.

  सरकारने या कार्यक्रमाचे चोख नियोजन केले होते. मात्र गेल्या दोन दिवसांत तापमानात झालेल्या वाढीमुळे ही दुर्घटना घडल्याचे सामंत यांनी सांगितले. उष्णतेमुळे लोकांना त्रास होऊ नये यासाठी हा कार्यक्रम संध्याकाळी घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. संध्याकाळी कार्यक्रम संपल्यानंतर लोकांना घरी जाण्यास विलंब होईल म्हणून हा कार्यक्रम सकाळी घेण्याचा आग्रह श्रीसदस्यांकडून करण्यात आला. त्यानुसार हा कार्यक्रम १२ वाजता ठरला होता. मात्र वाढते तापमान लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  गृहमंत्री अमित शहा यांना विनंती करून हा कार्यक्रम सकाळी १०.३० वाजता ठरविला. कार्यक्रमस्थळी पाणी, वैद्यकीय व्यवस्था अगदी चार हजार खाटांचे रूग्णालयही उभारण्यात आले होते. मात्र दोन दिवसांत तापमानात वाढ होऊन ते ३५-३६ अंशापर्यंत गेले. त्यातून ही घटना घडल्याचा दावा सामंत यांनी केला.   तरीही विरोधकांकडून या घटनेचे राजकारण केले जात असून या घटनेचा धक्का बसलेल्यांना सावरण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याची गरज आहे.

मृतांची संख्या १३ वर

पनवेल : खारघर येथील महाराष्ट्र भूषण महासोहळय़ातील घटनेत मृतांची संख्या सोमवारी १३ वर पोहोचली आहे.  हे मृत्यू उष्माघात आणि निर्जलीकरण यामुळे झाल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे. मृतांची नावे- 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • महेश रायकर, ४२ वर्षे, वडाळा, मुंबई
  • जयश्री पाटील, ५४ वर्षे, म्हसळा, रायगड
  • मंजूषा भोंबडे, ५१ वर्षे, गिरगाव, मुंबई ल्ल स्वप्निल केणी, ३० वर्षे, विरार 
  • तुळशीराम बांगड, ५८ वर्षे, जव्हार, पालघर
  • कलावती वायचळ, ४६ वर्षे, सोलापूर 
  • भीमा साळवी, ५८ वर्षे, कळवा, ठाणे
  • सविता पवार, ४६ वर्षे, मुंबई
  • पुष्पा गायकर, ६४ वर्षे, कळवा, ठाणे
  • वंदना पाटील, ६२ वर्षे, खालापूर, रायगड  
  • मीनाक्षी मिस्त्री, ५८ वर्षे, वसई 
  • गुलाब पाटील, ५६ वर्षे, विरार

या घटनेमुळे मला दु:ख झाले. मृतांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. जे उपचार घेत आहेत, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होऊ देत.

– अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री.