पुणे : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे तीव्र चटके बसत असतानाच मंगळवारी शहर आणखी तापले. लोहगाव येथे ४२.७ अंश सेल्सिअस, तर शिवाजीनगर येथे ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे तापमानात वाढ होत असून, दोन दिवसांनी तापमानात किंचित घट होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
यंदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच तापमानाचा पारा वाढला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. दिवसा उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. मंगळवारी कोरेगाव पार्क येथे ४१.४ अंश सेल्सियस, हडपसर येथे ४०.७, पाषाण येथे ४०.६, चिंचवड येथे ४०.३, मगरपट्टा येथे ३९.६, एनडीए येथे ३९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. शिवाजीनगर येथे नोंदवले गेलेले ४१.३ अंश सेल्सियस हे यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.
हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नाही. हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे, आकाश निरभ्र असल्यामुळे सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. तसेच किमान तापमानही वाढ झाली आहे. रात्री उकाडा जाणवण्यामागे शहरीकरणासारखे विविध घटक कारणीभूत आहेत. तापमान वाढ आणखी दोन दिवस कायम राहून त्यानंतर तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे.
एप्रिलमधील आजवरच्या सर्वाधिक तापमानाची नोंद १८९७ मध्ये
हवामान विभागाकडे असलेल्या ऐतिहासिक नोंदींनुसार एप्रिलमध्ये शिवाजीनगर येथे सर्वाधिक ४३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद १८९७मध्ये झाली होती. त्या खालोखाल १९५८मध्ये ४३.२ अंश सेल्सिअस तापमान होते. २०१९मध्ये २९ एप्रिल रोजी ४३ अंश सेल्सिअस, २८ एप्रिल रोजी ४२.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते.