मुंबई : संरक्षण दल क्षेत्रातील राज्यातील विविध ठिकाणच्या कटकमंडळांचे त्या भागातील महापालिकांमध्ये विलिनीकरण करण्याचा निर्णय गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्य बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पुणे, खडकी कटकमंडळाचे पुणे महापालिकेत, औरंगाबाद कटकमंडळाचे छत्रपती संभाजी नगर महापालिकेमध्ये, देवळाली व अहिल्यानगर कटकमंडळाची स्वतंत्र नगरपालिका, कामठी कटकमंडळाचे येरखेडा नगरपंचायतीमध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे. कटकमंडळाचा महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थात समावेश झाल्याने तेथे नागरीसुविधा तसेच इतर विकास कामांना पुरेसा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधानभवन येथे पार पडलेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह नगरविकास विभागाचे प्रधान सचिव के.एच.गोविंदराज, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, तसेच दूरचित्र संवादाच्या माध्यमातून केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे सहसचिव, सबंधित जिह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, कटक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.                                               

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कटकमंडळांचे क्षेत्रातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी ते क्षेत्र शेजारच्या महापालिका,नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. त्याला अनुसरून राज्य शासनाने राज्यातील कटकमंडळे लगतच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाविष्ट केली आहेत. राज्यात पुणे,खडकी,देवळाली, छत्रपती संभाजी नगर,कामठी, अहिल्यानगर, देहू रोड येथे कटकमंडळ क्षेत्र आहे. प्रत्येक कटकमंडळाबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात आला आहे. देहूरोड कटकमंडळ संरक्षण विभागाच्या दृष्टीने महत्वाचे असल्यामुळे तसेच ठेवण्यात येणार आहे. या कटकमंडळातील कर, वीज, पाणी आर्थिक प्रकरणे,कर्मचारी यांचे हस्तांतरणाची प्रक्रिया संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे करण्यात यावी, असे आदेश फडणवीस यांनी दिल्याचे समजते. तर कटकमंडळाचा समावेश झाल्याने या परिसराचा विकास करण्यासाठी जिल्हा नियोजन निधीमधून मदत करण्यात येईल.संबधित समाविष्ट नगरपालिका आणि महानगरपालिकांनी त्यासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करावेत, अशा सूचना अजित पवार यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.