मुंबई : हवामान विभागाने गुरुवारी मुंबईसह ठाणे, पालघर भागात वादळी वाऱ्यांसह पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला असून अनुषंगाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. या कालावधीत काही भागात जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मागील दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील काही भागात बुधवारी सोसाट्याच्या वाऱ्यांसह वळिवाच्या पावसाने हजेरी लावली होती. आता पुन्हा मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यावेळी वारे ताशी ३० ते ४० किमी वेगाने वाहतील. राज्यातील इतर काही भागातही वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ तसेच कोकणातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस वादळी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात मागील चार दिवसांपासून विविध भागांत पावसाच्या सरी कोसळत आहेत. तसेच ढगाळ हवामानामुळे तापमानातही काहिशी घट झाली आहे. पावसामुळे काही ठिकाणी पिकांचेही नुकसान होत आहे. राज्यात काही भागात पुढील पाच दिवस वादळी पावसासाठी पोषक वातावरण आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पुढील दोन तीन दिवसांत मोसमी वाऱ्यांची वाटचाल

नैऋत्य मोसमी वारे मंगळवारी अंदमानमध्ये दाखल झाले. पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, मालदीव आणि कोमोरिनचा काही भाग तसेच दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, संपूर्ण अंदमान आणि निकोबार बेटे, अंदमान समुद्राचा उरलेला भाग आणि मध्य बंगालाच्या उपसागराच्या काही भागात नैऋत्य मोसमी वारे वाटचाल करतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पावसाचा अंदाज कुठे

विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशीम, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदीया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस कोसळेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मराठवाड्यातील जालना, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्ह्यातही काही ठिकाणी पुढील ५ दिवस वादळी पावसाला पोषक वातावरण आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे आणि अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातही काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे. कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, जिल्ह्यातही सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.