Maharashtra Weather Update Today : यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने जूनच्या सुरुवातीपासून उघडीप दिली आहे. दोन आठवड्यापासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांची वाटचाल मंदावली आहे. मात्र, आता पुढील दोन तीन दिवसांत मोसमी वारे प्रगती करतील अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली आहे. त्याचबरोबर पुढील तीन ते चार दिवसांत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
तामिळनाडू आणि दक्षिण महाराष्ट्रादरम्यान वाऱ्यांची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उत्तर ओडिशा आणि जवळच्या भागांत वाऱ्यांची चक्राकार स्थिती निर्माण झाली असून ही स्थिती दक्षिण महाराष्ट्राकडे सरकत आहे. त्यामुळे गुरुवारपासून सलग काही दिवस दक्षिण कोकणासह इतर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यावर पावसाचा प्रभाव अधिक राहील. उर्वरित भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. राज्यात १२ ते १७ जून या कालावधीत जोरदार पाऊस पडेल. या कालावधीत कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात २४ तासांत ६४.५ मिमी ते २०४.४ मिमी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर १३ आणि १४ जून रोजी कोकणात २४ तासांत २०४.५ मिमीहून जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दरम्यान, मोसमी वाऱ्यांनी बुधवारी वाटचाल केलेली नाही. मोसमी वाऱ्यांची सीमा बुधवारीही मुंबई, अहिल्यानगर, अदिलाबाद, भवानीपटना, पुरी आणि बालूरघाट परिसरात होती. सध्या मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांची वाटचाल पुन्हा सुरू होण्याचा अंदाज आहे. मोसमी वारे शनिवारपर्यंत मध्य भारतात आणि पूर्वेकडील राज्यांमधील काही भागात प्रगती करण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.