मुंबई : मुंबई आणि उपनगरांत बुधवार रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळे धास्तावलेल्या मुंबईकरांचा गोंधळ हवामान विभागाच्या इशाऱ्यांनी गुरूवारी वाढवला. दिवसभर ऑरेंज अलर्ट की रेड अलर्ट या गोंधळातच मुंबईकरांचा दिवस सरला. सुरूवातीला अतिमुसळधार पावसाचा इशारा नंतर अतिवृष्टीचा इशारा तो नागरिकांपर्यंत पोहोचतो आहे तोच पुन्हा बदल करून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. हवामान विभागाच्या सतत बदलणाऱ्या इशाऱ्यांमुळे खासगी कंपन्या, शाळांचे व्यवस्थापन दिवसभर संभ्रमात होते. पावसाने मात्र हवामान विभागाचा अतिमुसळधार पावसाचाही आणि अतिवृष्टीचाही इशारा खोटा ठरवला.

सध्या संपूर्ण राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. राज्यात बहुतांश भागात पाऊस कोसळत आहे. मुंबईतही मागील दोन तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. काही भागात हलक्या सरी हजेरी लावत आहेत तर काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान, किनारपट्टीभागात गुरुवारी पावसाचा जोर अधिक होता. वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे किनारपट्टी भागांत पाऊस वाढला आहे. तसेच वाऱ्यांचा वेगदेखील गुरूवारी वाढलेला होता. मुंबईत बुधवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता.

बुधवारी सकाळी ८:३० ते गुरुवारी सकाळी ८:३० या २४ तासांत कुलाबा केंद्रात १४२.६ मिमी तर, सांताक्रूझ केंद्रात ६०.५ मिमी पावसाची नोंद झाली. गुरूवारी सकाळीही मुंबईतील काही भागांत पावसाची संततधार होती. त्यामुळे सकाळच्या सत्रातील शाळांमध्ये मुलांना पाठवावे का अशा संभ्रमात असलेल्या पालकांनी शाळांच्या व्हॉट्स ॲप ग्रुपवर शाळा भरण्याबाबत विचारणा सुरू केली.

प्रादेशिक हवामान विभागाने गुरुवारी सकाळी पहिल्यांदा मुंबईला सकाळी ६:३० वाजता अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर १२ वाजण्याच्या सुमारास हवामान विभागाने सुधारीत अंदाज जाहीर करून अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे दुपारच्या सत्रातील शाळा भरवण्याबाबत शाळा व्यवस्थापनाचा संभ्रम उडाला. मात्र, शाळा इशाऱ्याची माहिती पोहोचून काही निर्णय घेईपर्यंत विभागाने पुन्हा सुधारित अंदाज जाहीर केला आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला.

दरम्यान अनेक खासगी कंपन्यांन या इशाऱ्यांचा आधार घेऊन कर्मचाऱ्यांना लवकर घरी जाण्याची तर काही ठिकाणी घरून काम करण्याची सवलत दिली. प्रत्यक्षात पाऊस मात्र विभागाच्या इशाऱ्याबरहुकूम पडला नाही. दुपारनंतर अनेक भागांतील पाऊस ओसरला. एखादी मोठी सर हजेरी लावत होती. मात्र अतिमुसळधार किंवा अतिवृष्टी म्हणावा असा पाऊस फारसा झाला नाही. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी सकाळी ८:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत सरासरी १ मिमी तर सांताक्रूझ केंद्रात सरासरी १८ मिमी पावसाची नोंद झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी हलक्या सरींचा अंदाज

मुंबईत शुक्रवारी हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे पालघर भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. जूनच्या सुरुवातीपासून पावसाने मुंबईत उघडीप दिली होती. त्यानंतर पंधरा दिवसांनी पावसाने मुंबईत पुन्हा कोसळण्यास सुरूवात केली आहे.