मुंबई : राज्यात बुधवार, १३ ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढणार असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, कोकण, घाटमाथा आणि विदर्भात आजपासून पावसाचा जोर अधिक असेल. याचबरोबर उर्वरित भागातही पाऊस पडेल. या कालावधीत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
गेले काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. अधूनमधून हलक्या सरी बरसत होत्या. मात्र, मुसळधार पाऊस पडलेला नाही. त्यानंतर आता पुन्हा राज्यात पाऊस सक्रिय झाला आहे. पुढील चार ते पाच दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. या कालावधीत अनेक भागात ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहतील. सर्वाधिक पावसाची शक्यता कोकण, विदर्भ आणि घाटमाथ्यावर आहे. या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
कमी दाब क्षेत्र
आंध्र प्रदेश आणि तेलंगणा परिसरावर, कच्छ आणि परिसरावर, तसेच कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरात आज हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. याचाच परिणाम म्हणून आजपासून संपूर्ण राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र या आठवड्यात तेलंगणाहून महाराष्ट्राकडे वेगाने सरकणार आहे. यामुळे पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. याचबरोबर मुंबईतही १५, १६ ऑगस्टपासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पाऊस कधी, कुठे
मराठवाडा, पुणे आणि मध्य महाराष्ट्रात १३ ते २० ऑगस्टदरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे येथे १४ ते २० ऑगस्टदरम्यान सर्वाधिक पावसाची शक्यता आहे. याचबरोबर लातूर, नांदेड, सोलापूर, संभाजीनगर आणि मराठवाड्यातील प्रमुख भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भात आजपासून पुढील चार ते पाच दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक असेल. त्यामुळे काही भागात आज सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
मुंबईची स्थिती काय
मुंबईतही आजपासून पाऊस सक्रिय होणार आहे. पुढील तीन ते चार दिवस मुंबईत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मुंबईत आजही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
आज पावसाचा अंदाज कुठे
मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा घाट परिसर, जालना, परभणी बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव
अतिमुसळधार पावसाचा इशारा
यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा
हलक्या सरी
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, सांगली, छत्रपती संभाजीनगर