‘दहिसर – डी. एन. नगर मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – अंधेरी मेट्रो ७’ मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याला अद्याप प्रवाशांकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. पहिल्या टप्प्यातील मार्गिकांवरून धावणाऱ्या मेट्रोतून दर दिवशी साडेतीन लाख प्रवासी प्रवास करतील असा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात या मार्गावरून दिवसाला २६ ते २८ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यापासून पाच महिन्यांत या मार्गिकेवर ४५ लाख ६२ हजार २२७ प्रवाशांनी प्रवास केला.
हेही वाचा >>> सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांतील भेसळ वाढली ; लाखो रुपयांचे खाद्यतेल व अन्नपदार्थ जप्त
दहिसर ते आरे असा २० किमी लांबीचा पहिला टप्पा २ एप्रिलपासून वाहतूक सेवेत दाखल झाला. तसेच या दोन्ही मार्गिकेतील दुसरा टप्पा डिसेंबरपर्यंत सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. सेवेत दाखल झालेल्या पहिला टप्पातील मार्गिकांवरील मेट्रोतून दर दिवशी साडेतील लाख प्रवासी प्रवास करतील, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केला होता. मात्र पहिल्या टप्प्याला प्रवाशांकडून प्रतिसादच मिळत नसल्याने हा दावा फोल ठरला आहे. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमएमएमओसीएल) मिळालेल्या आकडेवारीनुसार, २ एप्रिल ते १ मेदरम्यान आठ लाख ८३ हजार ३५४ प्रवाशांनी या मेट्रोतून प्रवास केला. याद्वारे एक कोटी ७५ हजार रुपये महसूल मिळाला. पहिल्या महिन्यात दिवसाला प्रवासी संख्या सरासरी २६ हजार इतकी होती. आता पाच महिन्यानंतरही या मेट्रोतून दर दिवशी साधारण २६ ते २८ हजार प्रवासी प्रवास करीत आहेत.
हेही वाचा >>> Video : गणेशोत्सव मिरवणुकीत भाजपाचेच दोन गट आपापसांत भिडले; अखेर पोलिसांना करावी लागली मध्यस्थी!
पहिल्या टप्प्याला पाच महिने पूर्ण झाले असून यादरम्यान एकूण ४५ लाख ६२ हजार २२७ प्रवाशांनी मेट्रोतून प्रवास केला आहे. म्हणजेच दिवसाला २६ ते २८ हजार प्रवाशी प्रवास करीत आहेत. ही मार्गिका पूर्णतः सुरू न झाल्याने, आरे मेट्रो स्थानकापासून रेल्वे स्थानक दूर असल्याने प्रवाशांना पहिला टप्पा सोयीचा ठरत नसल्याने प्रतिसाद मिळत नसल्याचे समजते. दुसरा टप्पा म्हणजेच या दोन्ही मार्गिका पूर्णतः सेवेत दाखल झाल्यानंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढेल असा दावा एमएमआरडीएकडून करण्यात येत आहे.
२ एप्रिल ते ६ सप्टेंबर दरम्यानची प्रवाशी संख्या
मेट्रो २ अ
एप्रिल – ४,३८,१६३
मे – ४,२२,३४१
जून – ४,१३,३७३
ऑगस्ट – ५,१०,५५७
सप्टेंबर – ९३,८०३
एकूण – २३,६७,४५८
मेट्रो ७
एप्रिल – ४,१३,४८६
मे – ४,०६,९६१
जून – ३,९२,७५२
जुलै – ४,३०,२००
ऑगस्ट- ४,६८,६५८
सप्टेंबर – ८२,७१३
एकूण – २१,९४,७७०