आरेच्या ‘मेट्रो भवना’त मेट्रो संचालनाचे धडे

‘एमएमआरडीए’चे ‘मुंबई मेट्रो संचालन महामंडळ’ या इमारतीत असेल.

(संग्रहित छायाचित्र)

अक्षय मांडवकर

परदेशी तज्ज्ञांच्या साहाय्याने प्रशिक्षण

‘दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’च्या धर्तीवर ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिक रण’(एमएमआरडीए) आरे वसाहतीत उभारण्यात येणाऱ्या मेट्रो भवनामध्ये मेट्रो संचालन-व्यवस्थापन आणि इतर तांत्रिक बाबींच्या मार्गदर्शनाकरिता प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे.

‘एमएमआरडीए’चे ‘मुंबई मेट्रो संचालन महामंडळ’ या इमारतीत असेल. या महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी या केंद्रामध्ये हाँगकाँग, सिंगापूर आणि अन्य देशांमधील तंज्ज्ञांना पाचारण्यात येणार आहे.

मेट्रो मार्गिकेचे संचलन आणि व्यवस्थापन एकाच छत्राखाली करण्यासाठी ‘एमएमआरडीए’ प्रशासन ‘मेट्रो भवन’ बांधणार आहे. आरे वसाहतीतील ५.०३ एकर जागेवर मेट्रो भवनाची ३२ मजली इमारत उभी राहील. या इमारतीची उंची सुमारे १५० मीटर असेल. ‘एमएमआरडीए’अंतर्गत सुरू  असलेल्या मेट्रो मार्गिकांच्या संचालन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी खासगी संस्थांना देणे यापुढे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही. त्यामुळे प्राधिकरणाकडून काही दिवसांपूर्वी ‘मुंबई मेट्रो संचालन महामंडळ’ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. हे महामंडळ स्वायत्तपणे काम करेल. या मंडळाचा विभाग मेट्रो भवन इमारतीत प्रस्तावित आहे. भवनाच्या दुसऱ्या ते पाचव्या मजल्यापर्यंत सुमारे १८,२०० चौमी क्षेत्रात महामंडळाचा विभाग कार्यरत असेल. या महामंडळातील कर्मचाऱ्यांना आणि प्राधिकरणातील निवडक अधिकाऱ्यांना संचलन आणि व्यवस्थापनासंबंधी तांत्रिक प्रशिक्षण देण्याकरिता भवनात प्रशिक्षण केंद्र राखीव ठेवण्यात आले आहे. मेट्रो भवनाच्या पहिल्या मजल्यावरील ९६९९ चौमी क्षेत्रात हे प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येईल.

मेट्रो संचलन आणि व्यवस्थापन तांत्रिकदृष्टय़ा सातत्याने बदलणारे आहे. या तांत्रिक बदलांविषयी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण महामंडळ आणि प्राधिकरणातील कर्मचाऱ्यांना देण्यासाठी  मेट्रो भवनाच्या प्रस्तावित इमारतीत प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’चे महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांनी दिली. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या पाश्र्वभूमीवर या प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात येणार असून प्रशिक्षण देण्यासाठी हॉंगकॉंग आणि सिंगापूर मेट्रो मंडळांमध्ये कार्यरत असणाऱ्या तंज्ज्ञांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय प्रशिक्षणाखेरीच त्यासंबंधीचे अभ्यासक्रम देखील उपलब्ध करुन देण्याचा विचार असल्याचे ते म्हणाले. तर मेट्रो भवन उभारण्याकरता जानेवारी महिन्याच्या अखेरीस कंत्राट प्रक्रिया खुली होणार असल्याची प्राधिकरणातील एका अधिकाऱ्याने दिली.

मेट्रो भवनाची रचना

* तळघर – वाहनतळ

* तळमजला – स्वागत कक्ष

* पहिला मजला – प्रशिक्षण

केंद्र

* दोन ते पाच मजले – मेट्रो संचलन महामंडळ

* सहावा मजला – उपाहारगृह

* सात ते अकरा मजले – कार्यालय

* १३ ते १९ मजले – कर्मचारी अधिवास

* २१ ते ३२ मजले – कार्यालय

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Metro operating lessons in aareys metro bhavan

ताज्या बातम्या