म्हाडातील ५६५ रिक्त जागांसाठी भरती परीक्षा सुरू आहे. त्यानुसार सोमवारी (७ फेब्रुवारी) अतांत्रिक पदासाठीचा पेपर आहे. सोमवारचा पेपर वेळापत्रकानुसारच पार पडेल अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. रविवारी (६ फेब्रुवारी) भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारकडून दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘म्हाडा’चे सचिव राजकुमार सागर यांनी माहिती दिली.

राजकुमार सागर म्हणाले, “म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होईल. यानुसार सोमवारी (७ फेब्रुवारी) सकाळी ०९.०० ते ११.०० वाजेपर्यंत, दुपारी १२.३० ते २.३० वाजेपर्यंत, तर दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा तीन सत्रांत परीक्षा होणार आहे. याची सर्व अर्जदारांनी/परीक्षार्थींनी नोंद घ्यावी.”

म्हाडातील १४ पदांच्या ५६५ रिक्त जागांसाठी भरती

दरम्यान, म्हाडातील १४ पदांच्या ५६५ रिक्त जागा भरण्यासाठी १२ ते २० डिसेंबरदरम्यान राज्यभर भरती परीक्षा होणार होती. त्यासाठी पावणे तीन लाख अर्ज आले होते. मात्र परीक्षेला काही तास शिल्लक असताना, मध्यरात्री गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी परीक्षा रद्द केल्याचे जाहीर केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रश्नपत्रिका फोडल्याच्या आरोपानंतर परीक्षा रद्द”

परीक्षा घेण्याचे कंत्राट असलेल्या जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीच्या एका संचालकाने प्रश्नपत्रिका फोडण्याचा डाव आखला होता. पुणे सायबर पोलिसांनी कारवाई करून कंपनीच्या संचालकाला आणि दलालांना अटक केले. या गैरप्रकारानंतर म्हाडाने स्वत: परीक्षा घ्यावात असे सरकारने जाहीर केले. त्यानुसार म्हाडाने ऑनलाइन परीक्षा घेण्याची तयारी केली आहे.