मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाने बोरीवलीमधील मागाठाणे येथे टर्न की योजनेअंतर्गत एक गृहनिर्माण प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पाचे कंत्राट अंतिम करून कार्यादेशही जारी करण्यात आला होता. मात्र प्रकल्पास पर्यावरणविषयक मंजुरी नसल्याने घरांचे बांधकाम रखडले होते. आता मात्र या घरांच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मागाठाण्यात ६४० घरे बांधण्यासाठी पर्यारवणविषयक परवानगी मिळाली आहे. आता लवकरच या घरांच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या घरांचा समावेश मुंबई मंडळाच्या मार्च २०२६ मधील सोडतीत चालू बांधकाम प्रकल्प योजनेअंतर्गत केला जाणार आहे.
मागाठाणे येथील सीटीएस क्रमांक १८३ (पैकी), १८४ (पैकी), १८५ (पैकी), १८६ (पैकी), १८७ (पैकी, १९६ (पैकी), १९७ (पैकी) आणि २०१ (पैकी) या जागेवर मुंबई मंडळाने ५१२ घरांचे बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. या ५१२ घरांमध्ये १२४ संक्रमण शिबिराच्या गाळ्यांचा, तर मध्यम गटातील ३९० घरांचा समावेश होता. या प्रकल्पासाठी मंडळाने निविदा प्रक्रिया राबवून बी. जी. शिर्के कंपनीला कंत्राट दिले. त्यासंबंधीचे कार्यादेशही दिले. मात्र या प्रकल्पासाठी पर्यावरणविषयक मंजुरी नसल्याने प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करता आली नाही.
मुंबई मंडळाने या प्रकल्पात काही सुधारणा करून प्रस्ताव पर्यारवणीय मंजुरीसाठी पाठवला. त्यानुसार या जागेवर ५१२ ऐवजी ६४० घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. या ६४० घरांमध्ये १२४ संक्रमण शिबिराचे गाळे, अल्प उत्पन्न गटातील २५८ घरे, अत्यल्प उत्पन्न गटातील १३० घरे आणि उच्च गटातील १२८ घरांचा समावेश करण्यात आला आहे. या १०६ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पास अखेर आता पर्यावरणविषयक मान्यता मिळाल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
पर्यावरणविषयक मंजुरी मिळाल्याने आता ६४० घरांंच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. संक्रमण शिबिराच्या १२४ घरांचा समावेश असलेली इमारत सात मजली असणार आहे, तर अल्प आणि अत्यल्प गटातील घरांचा समावेश असलेली इमारत २२ मजली असणार आहेच. त्याचवेळी उच्च गटासाठी ३३ मजली इमारत बांधण्यात येणार असून यात १२८ घरांचा समावेश असणार आहे. दरम्यान, मुंबई मंडळाकडे सोडतीसाठी पुरेशी घरे नव्हती. त्यामुळे २०२५ मध्ये सोडत काढण्यात आली नाही.
मात्र मार्च २०२६ मध्ये सोडत काढण्याचा निर्धार म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी केला आहे. या सोडतीत अधिकाधिक घरे असावीत या उद्देशाने चालू बांधकाम प्रकल्पातील घरांचा सोडतीत समावेश करून विकासकाप्रमाणे विजेत्यांकडून टप्प्याटप्प्याने घराची रक्कम वसूल करायची आणि काम पूर्ण झाल्यास घराचा ताबा देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे या ६४० घरांचा समावेश मार्च २०२६ च्या सोडतीत असणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घरांचे काम दोन ते तीन वर्षांत पूर्ण करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे. त्यामुळे सोडतीनंतर विजेत्यांना या घरांसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागणार नाही, असा दावाही अधिकाऱ्यांनी केला.
