मुंबई : अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी ४ लाखांची लाच मागणारा म्हाडाचा कार्यकारी अभियंता मुंबईच्या लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. लाचेच्या रकमेतील ४० हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई गुरूवारी संध्याकाळी करण्यात आली.
तक्रारदारांचे रो हाऊस आहे. त्यावर अनधिकृत पत्रे चढवून तेथे पोटभाडेकरू ठेवण्यात आले होते. याबाबत म्हाडामध्ये अहवाल देऊन कारवाई करण्याची धमकी म्हाडामधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाने दिली होती. याबाबत कारवाई न करण्यासाठी त्याने ४ लाखांची लाच मागितली. तडजोडीनंतर २ लाख स्वीकारण्याचे कबून केले. परंतु तक्रारदारांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
४० हजार स्वीकारताना अटक
या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. आरोपीने २ लाखांपैकी पहिला हप्ता म्हणून ४० हजार घेऊन येण्यास सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला आणि आरोपीला पंचासमक्ष रंगेहात पकडण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा तपास अधिकारी (सहाय्यक पोलीस आयुक्त) मानसिंग पाटील पर्यवेक्षण अधिकारी (पोलीस निरीक्षक) गणपत परचाके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
लाचखोरीच्या वाढत्या घटना
२०२५ मध्ये मुंबईत आणि आसपासच्या परिसरात लाचखोरीच्या अनेक गंभीर घटना समोर आल्या असून, लाचलुचपत प्रतिबंक खाते (एसीबी) आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) यांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आहे. मुंबईत २०२५ मध्ये लाचखोरीची प्रकरणे केवळ लहान कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नसून वरिष्ठ अधिकारी, अभियंते आणि नगरपालिका अधिकारी यांच्यापर्यंत पोहोचली आहेत. मुंबईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालू वर्षात ३२ गुन्हे नोंदविले होत. त्यात ५२ जणांना अटक करण्यात आली. याशिवाय अपसंपदेचे २ गुन्हे नोंदविण्यात आले.