लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: म्हाडा कोकण मंडळाच्या ४,६५४ घरांसाठी १० मे रोजी काढण्यात आलेल्या सोडतीत केवळ २२१९ जण विजेते ठरले असून या सर्व विजेत्यांना मंडळाकडून स्वीकृती पत्र पाठविण्यात आले आहे. आता जूनच्या पहिल्या आठवड्यापासून विजेत्यांना तात्पुरते देकार पत्र पाठवून घरांचा ताबा देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. निवासी दाखला मिळालेल्या घरांची रक्कम भरून घेऊन विजेत्यांना ताबा देण्यात येणार आहे.

नवीन बदलानुसार विजेत्यांची पात्रता निश्चिती आधीच झाली आहे. पूर्वी प्रथम सूचना पत्र पाठवून विजेत्यांकडून कागदपत्र जमा करून घेऊन पात्रता निश्चिती करण्यात बराच काळ जात होता. पण आता ही प्रक्रिया बाद झाल्याने वेळ वाचणार असून विजेत्यांना लवकरात लवकर घरांचा ताबा मिळणार आहे. सोडत झाल्यानंतर मंडळाने अयशस्वी अर्जदारांना अनामत रक्कमेचा परतावा देण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे २,२१९ विजेत्यांना ई – स्वीकृती पत्र पाठविल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. येत्या सात दिवसांत घराच्या स्वीकृतीस मान्यता देणाऱ्यांना जूनच्या पहिल्या आठवड्यापासून तात्पुरते देकार पत्र पाठविण्यास सुरुवात करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा-बोरिवलीतील स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; वेश्याव्यवसायातून पाच महिलांची सुटका

सोडतीतील तयार असेलेली आणि निवासी दाखला मिळालेल्या घरांची रक्कम विजेत्यांकडून ठराविक मुदतीत भरून घेतली जाणार आहे. त्यामुळे आता विजेत्यांनी घराची रक्कम जमा करण्याची, गृहकर्जाची प्रक्रिया सुरू करण्याची आवश्यकता आहे. दरम्यान, २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील विजेत्यांना म्हाडाकडे घराच्या एकूण किमतीच्या केवळ एक टक्के रक्कम मंडळाकडे भरावी लागणार आहे. त्यानंतर मंडळ संबंधित विजेत्यांना गृहकर्जासाठी ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देईल. त्यानंतर मात्र घराच्या ९९ टक्के विक्री किंमतीचा भरणा विकासकाकडे करावा लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे विक्री किंमतीसह वाहनतळ, जीएसटीएस अनेक प्रकारचे शुल्कही विजेत्यांना भरावे लागणार आहे. घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया विकासकांकडूनच पूर्ण केली जाणार आहे.