लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४,६५४ (१४ भूखंडांसह) घरांच्या सोडतीच्या माध्यमातून मराठी मालिका विश्वातील सध्याच्या आघाडीच्या कलाकारांचे हक्काच्या घराचे स्वप्न बुधवारी पूर्ण झाले. अभिनेता विवेक सांगळे, नयन जाधव, अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकार हे ठाण्यातील रेमंड प्रकल्पातील घरांसाठी विजेते ठरले आहेत.
कोकण मंडळाच्या ४,६५४ घरांसाठी बुधवारी सोडत काढण्यात आली. सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकारांचेही लक्ष या सोडतीकडे लागले होते. ‘भाग्य दिले तू मला’मधील राजवर्धन मोहिते अर्थात विवेक सांगळे, ‘जीव माझा गुंतला’मधील अंतरा अर्थात योगिता चव्हाण, ‘ठिपक्यांची रांगोळी’मधील अप्पू म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकार, ‘हास्यजत्रा’फेम पृथ्वीक प्रताप, अभिनेते नयन जाधव आदी कलाकारांनी सोडतीसाठी अर्ज केले होते. म्हाडाची सोडत बुधवारी जाहीर झाली आणि अर्जदारांपैकी काही कलाकारांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. विवेक सांगळे, नयन जाधव, ज्ञानदा रामतीर्थकार हे रेमंडमधील घरांसाठी विजेते ठरले आहेत. विवेक सांगळे आणि ज्ञानदा यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना आपले घराचे स्वप्न पूर्ण झाल्याचा आंनद व्यक्त केला.
आणखी वाचा-मुंबई: पहिल्या मजल्यावर मनोरंजन मैदानाबाबत सर्वोच्च न्यायालयाचीही नापसंती!
मागील वर्षभरापासून मी ठाण्यात घर घ्यायच्या विचारात होतो. म्हाडाची सोडत जाहीर झाली आणि मी रेमंडसह अन्य काही ठिकाणी अर्ज भरले. मुळात ठाणे शहर मला खूप आवडते. यादृष्टीने मी ठाण्यातील घरांसाठी अर्ज केला होता. यापूर्वी एकदा म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला होता. पण तेव्हा घर लागले नाही. आज रेमंडचे घर लागल्याची बातमी समजताच खूप आनंद झाला. एक मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. यासाठी म्हाडाचे आभार. -विवेक सांगळे, अभिनेता
मी सध्या ठाण्यात आत्याच्या घरी राहते. आपले हक्काचे घर व्हावे यासाठी मी पाहिल्यांदाच अर्ज भरला होता. चित्रीकरणात व्यस्त असताना आमच्या माई अर्थात सुप्रिया पाठारे आणि आमचे मित्र पृथ्वीक प्रताप यांनी मला ही आनंदाची बातमी दिली. रेमंडमध्ये घर लागल्याचे समजताच खूप आंनद झाला. सर्वसामान्यांचे हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडा पूर्ण करते. आज माझेही घराचे स्वप्न म्हाडाने पूर्ण केले. त्याबद्दल आभार. आता पुढची प्रक्रिया पार पाडून घराचा ताबा घेणे महत्त्वाचे आहे. -ज्ञानदा रामतीर्थकार, अभिनेत्री