मुंबई : म्हाडा सोडतीतील अनेक अयशस्वी अर्जदारांना  काही वेळा अनामत रक्कमेचा परतावा होत नाही. अर्जदारांकडून योग्य बँक खाते क्रमांक उपलब्ध न झाल्याने ही अडचण येते. अनामत रक्कम योग्य बँक खात्यावरच जमा व्हावी यासाठी मंडळाने ‘पिनी टेस्टिंग’ पद्धतीचा अवलंब केला आहे. अर्जदाराने उपलब्ध केलेल्या बँक खात्यात एक रुपया जमा करून त्याची खात्री करून घेण्यात येणार आहे. त्यानंतरच अर्जदारांची अनामत रक्कम त्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.  याच खात्यात अनामत रक्कमेचा परतावा करण्यात येणार आहे.

सोडतीसाठी अर्ज भरतानाच इच्छुकांकडून उत्पन्न गटानुसार अनामत रक्कम घेण्यात येते. ही रक्कम पाच हजार रुपये ते ७५ हजार रुपये इतकी असते. अनेक जण एकापेक्षा अधिक अर्ज भरतात. त्यामुळे अशा अर्जदारांसाठी ही रक्कम मोठी असते. नियमानुसार सोडत जाहीर झाल्यानंतर अयशस्वी अर्जदारांना सोडतीनंतर सात-आठ दिवसाने या रक्कमेचा परतावा करण्यास सुरुवात होते. मात्र काही अर्जदारांना रक्कमेचा परतावा होत नाही आणि मग त्यांना म्हाडा कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात वा पाठपुरावा करावा लागतो.

हेही वाचा >>> वडाळ्यातील बेस्टच्या विद्युत उपकेंद्राला आग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्जदारांनी चुकीचा बँक खाते क्रमांक नमूद केल्याने, बंद बँक खाते क्रमांक दिल्याने अनामत रक्कमेचा परतावा होत नाही. यामुळे म्हाडाला टीकेला सामोरे जावे लागते. यावर तोडगा म्हणून कोकण मंडळाने २०२३ च्या सोडतीपासून ‘पिनी टेस्टिंग’ पद्धतीचा अवलंब केल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अर्जदाराने बँक खाते नमूद केल्यानंतर मंडळाकडून या खात्यात एक रुपया जमा करण्यात येत आहे. एक रुपया जमा झाल्यानंतरच बँक खाते क्रमांक योग्य असल्याची खात्री करण्यात येते. त्यानंतरच अर्जदाराला अनामत रक्कम भरता येणार आहे. सोडतीत अयशस्वी ठरलेल्या अर्जदाराची परताव्याची रक्कमही याच खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे अनामत रक्कमेचा परतावा झटपट होऊ शकेल, असा दावा मंडळातील अधिकाऱ्यांनी केला आहे. म्हत्त्वाचे म्हणजे मंडळाने सुरुवातीला खात्यात भरलेला एक रुपया अर्जदारांना परत करावा लागणार आहे.