मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थनगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला उपलब्ध झालेल्या भूखंडांपैकी चार भूखंडांवर घरे बांधण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. मुंबई मंडळाने २,३९८ घरांच्या बांधकामासाठी शुक्रवारी निविदा प्रसिद्ध केली. या ठिकाणी म्हाडाच्या ४० मजली चार इमारती उभ्या राहणार आहेत.

प्रसिद्ध निविदेनुसार या १,३५० कोटींहून अधिक खर्च या बांधकामासाठी अपेक्षित असून अल्प, मध्यम आणि उच्च गटासाठी घरे बांधण्यात येणार आहेत. तर ४० मजली चार इमारतींमध्ये ही २,३९८ घरे असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे म्हाडाकडून पहाडीमध्ये पहिल्यांदाच ३९ मजली इमारत बांधण्यात येत आहे. त्यापाठोपाठ आता पत्राचाळीच्या जागेवर ४० मजली इमारती बांधण्यात येणार आहेत.

हेही वाचा…समूह पुनर्विकासात इमारत मालकांच्या १०० टक्के संमतीला म्हाडाकडून आक्षेप, साडेआठशे इमारतींचा पुनर्विकास दृष्टिपथात!

पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प मंडळाकडे आल्यानंतर येथील विक्रीयोग्य घटकातील आणि म्हाडाच्या हिश्शातील भूखंडावर घरे बांधण्यासह भूखंडांच्या ई – लिलावाचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार येथील आर-१, आर-७, आर-४ आणि आर-१३ या तीन भूखंडांवर २,३९८ घरे बांधण्याचा प्रस्ताव मांडून त्यास मंजुरी घेण्यात आली. प्रस्तावानुसार या ४० मजली चार इमारतींमध्ये अल्प गटासाठी १,०२३ घरे, उच्च गटासाठी १३३ घरे आणि मध्यम गटासाठी १,२४२ घरे समाविष्ट असणार आहेत. तर ४७३ चौरस फूट ते १००० चौरस फुटांची ही घरे असणार आहेत. मुंबई मंडळाने या २,३९८ घरांच्या प्रकल्पासाठी शुक्रवारी निविदा प्रसिद्ध केली.

या निविदेनुसार आर-१ भूखंडावरील मध्यम आणि उच्च गटासाठीच्या एकूण ५७२ घरांच्या बांधकामासाठी अंदाजे ३७७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तर आर-७ भूखंडावरील अल्प आणि मध्यम गटासाठीच्या एकूण ५७८ घरांसाठी ३०८ कोटी रुपये, तर आर-४ भूखंडावरील अल्प आणि मध्यम गटातील १०२५ घरांसाठी अंदाजे ५०२ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. आर-१३ भूखंडावरील मध्यम आणि उच्च गटासाठीच्या एकूण २२३ घरांसाठी अंदाजे १६७ कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यानुसार १,३५० कोटी रुपयांहून अधिक रकमेची निविदा मंडळाने प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचा…बीकेसी आंदोलनप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार वर्षांत बांधकाम पूर्ण

शुक्रवारपासून निविदा सादर करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून निविदा सादर करण्याची अंतिम तारीख १९ सप्टेंबर आहे. तर २० सप्टेंबर रोजी तांत्रिक निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. महिन्याभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून निविदा अंतिम झाल्यानंतर वर्षअखेरीस चार इमारतींच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे मुंबई मंडळाचे नियोजन आहे. निविदेनुसार काम सुरू झाल्यापासून ४८ महिन्यांत अर्थात चार वर्षांत बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे या घरांचा ताबा २०२९-२०३० मध्ये मिळण्याची शक्यता आहे.