मुंबई : गोरेगाव पश्चिम येथील पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला विक्री घटकाअंतर्गत उपलब्ध झालेल्या नऊ भूखंडांपैकी चार भूखंडांवर २३९८ घरे बांधण्यासाठी मंडळाने कंत्राट बहाल केले आहे. त्यातील एका, आर-१३ भूखंडांवर आता मुंबई मंडळाकडून स्वतंत्र २३ मजली वाहनतळ बांधण्यात येणार आहे. हे वाहनतळ रोबोटीक अर्थात स्वयंचलित असतील. म्हाडाकडून पहिल्यांदाच स्वतंत्र रोबोटीक वाहनतळ बांधण्यात येणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास अन्य प्रकल्पातही रोबोटीक वाहनतळ बांधण्यात येईल. वादग्रस्त पत्राचाळ पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आला आहे.
या पुनर्विकासाअंतर्गत मुंबई मंडळाला विक्री घटकातील ९ भूखंड उपलब्ध झाले आहेत. त्यावर घरे बांधण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. त्यानुसार आर-१, आर-७, आर-१३ आणि आर-४ या चार भूखंडांवर एकूण २३९ घरे बांधण्यासाठी गेल्या वर्षी मंडळाने निविदा काढल्या होत्या. त्यानुसार आर-१३ भूखंडावर मध्यम आणि उच्च गटासाठी २२३ घरे बांधण्याचे १६७ कोटी रुपयांचे कंत्राट देव इंजिनिअरींग कंपनीला देण्यात आले आहे. आर-१३ सह चारही भूखंडांवरील बांधकामाला गेल्या वर्षी सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र पर्यावरणविषयक परवानगीचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने या प्रकल्पाच्या पर्यावरणविषयक परवानगी रखडल्याने बांधकामही रखडले आहे. आता मात्र न्यायालयाच्या निर्णयानुसार पर्यावरणविषयक परवानगी घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार लवकरच २३९८ घरांचा प्रस्ताव केंद्राकडे पर्यावरण परवानगीसाठी पाठविला जाणार आहे. ही परवानगी महिन्या-दीड महिन्यात मिळेल आणि आॅक्टोबरअखेरीस २३९८ घरांच्या कामास सुरुवात होईल अशी माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.
त्याचवेळी आर-१३ भूखंडावर ३२ मजली इमारत उभारत २२३ घरे बांधण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे ६ मीटरची जागा सोडावी लागणार असल्याने इमारतीत केवळ १८० इतकीच घरे बांधता येणार होती. या इमारतीतील ११ मजले केवळ वाहनतळासाठी वापरावे लागणार होते. ही अडचण लक्षात घेत म्हाडा प्राधिकरण आणि मुंबई मंडळाने वाहनतळाची स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय घेतला. तर हे वाहनतळ रोबोटीक वाहनतळ असणार आहे. त्यानुसार प्रस्ताव तयार करत त्यास म्हाडा उपाध्यक्षांकडून प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. तर आता चार भूखंडावरील घरांच्या प्रस्तावासह या रोबोटीक वाहनतळाचा प्रस्तावही केंद्राकडे पर्यावरणविषयक परवानगीसाठी पाठविला जाणार असल्याचेही अधिकार्यांनी सांगितले.
आर-१३ भूखंडावरील रोबोटीक वाहनतळ २३ मजली असणार असून म्हाडाचा असा हा पहिला प्रकल्प असणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी झाल्यास इतर प्रकल्पातही रोबोटीक वाहनतळ बांधण्याचे नियोजन मुंबई मंडळाचे आहे. मंडळाच्या प्रस्तावानुसार या रोबोटीक वाहनतळासाठी ५३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. स्वतंत्र वाहनतळाची इमारत उभारण्यात येणार असल्याने आता आर-१३ भूखंडांवर ३२ मजली निवासी इमारत बांधण्यात येणार असून यात आता २५१ घरे बांधली जाणार आहेत. तर रोबोटीक वाहनतळाची इमारत देखणी असणार असून यात ३१२ वाहने एकावेळी उभी करता येणार असल्याचेही अधिकार्यांनी सांगितले. फेस रिंडिंगद्वारे सदनिकाधारकांना या वाहनतळामध्ये स्वयंचलित पद्धतीने गाडी उभी करता येणार आहे. तीन मिनिटात गाडी लावता येणार असून बाहेर काढता येणार आहे. दरम्यान या वाहनतळासाठी येणार खर्च सदनिकाधारकांकडून विक्री किंमतीद्वारे वसूल करण्यात येणार आहे. त्यामुळे आ-१३ भूखंडावरील घरांच्या किंमतीत काहीशी वाढ होणार आहे. तर दुसरीकडे वाहनतळाच्या देखभालीसाठी प्रति सदनिकाधारक ९०० रुपये सदनिकाधारकांना मोजावे लागण्याची शक्यता आहे. मात्र ही घरे उच्च आणि मध्यम गटातील असल्याने या गटातील सदनिकाधारक इतका देखभाल शुल्क भरू शकतील असा दावाही यानिमित्ताने म्हाडाकडून केला जात आहे. तर वाहनतळाची गंभीर समस्या मार्गी लावण्यासाठी हा एक चांगला पर्याय ठरणार असल्याचाही दावा म्हाडाने केला आहे.