मुंबई : जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीतील मूळ रहिवाशांऐवजी बोगस कागदपत्रांच्या आधारे पुनर्विकसित इमारतीतील १८ सदनिका लाटणाऱ्या व्यक्तींविरोधात अखेर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) गुन्हा दाखल केला आहे. अशा २९ बोगस व्यक्ती असून त्यापैकी २१ जणांनी १८ सदनिकांचा लाभ मिळविला आहे. १९९२ पासून २०२१ या काळात हा घोटाळा झाला आहे.
दक्षिण मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत पुनर्रचित इमारती तर खासगी विकासकांमार्फत पुनर्विकसित इमारती उभारुन केल्या जातात. या नव्या इमारतीत मूळ रहिवाशांना घरे दिली जातात. परंतु मूळ रहिवाशांची यादी फुगविण्यात आल्याची तक्रार वेळोवेळी केली जाते. अशा रीतीने काही बोगस इसम अशा पुनर्विकसित इमारतीत सदनिका मिळवितात. अशीच एक तक्रार सुरेश चिकणे या इसमाविरुद्ध दाखल झाली. या व्यक्तीला सदनिका वितरीत करताना बोगस कागदपत्रे सादर करण्यात आली असून ही व्यक्ती मूळ रहिवाशी नसल्याची तक्रार करण्यात आली होती. म्हाडाच्या दक्षता विभागाने याप्रकरणी चौकशी सुरु केली तेव्हा गंभीर बाबी तपासात आढळून आल्या. याबाबत सादर केलेल्या अहवालाच्या आधारे मिळकत व्यवस्थापक अवधूत बेळणेकर यांनी खेरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
१९४-१९६ नरसिनाथा स्ट्रीट आणि ११७, सॅम्युअल स्ट्रीट या जुन्या इमारतींमध्ये ६३ मूळ रहिवाशी होते. जिल्हाधिकाऱ्यांकडून भूखंड संपादित केल्यानंतर मूळ रहिवाशांची यादी तयार केली जाते. या यादीनुसार मूळ रहिवाशाला पुनर्रचित वा पुनर्विकसित इमारतीत घर वितरीत केले जाते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मूळ यादीत १५ बेकायदा इसमांची नावे घुसवण्यात आल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाले यापैकी १३ इसमांनी पुनर्विकसित इमारतीत सदनिका मिळविण्यात यश मिळवले.
२०५-२०७, नरसिनाथ स्ट्रीट येथील इमारतीत कार्यकारी अभियंत्यांनी २१ मूळ रहिवाशांची टंकलिखित यादी जारी केली होती. या ऐवजी हस्तलिखित यादी निर्माण करुन १४ बोगस इसमांची नावे त्यात घुसवण्यात आली. त्यापैकी आठ जणांनी पुनर्विकासित इमारतीत सदनिका मिळविण्यात यश मिळवले. अशा रीतीने २१ बोगस इसमांनी पुनर्विकसित इमारतीतील १८ सदनिका मिळविल्या. यापैकी तीन रहिवाशांनी दोन सदनिकांच्या मोबदल्यात मोठ्या सदनिकांचा लाभ मिळविला. या सर्व सदनिका परळ, माझगाव, माटुंगा, ताडदेव आदी मोक्याच्या ठिकाणी वितरीत झाल्या आहेत.
या इसमांनी लाटल्या सदनिका : सुरेश चिकणे, फातिमा लुईस, हाजरा मलिक, युसुफ मोहम्मद अमीन साकीनाबी अमीन सय्यद, गंगाराम सकपाळ, शालिनी कवटेकर, तानाजी तावडे, लक्ष्मण दळवी, आयेशा शेख, पियुश दोशी, दिलीप बने, हिराबाई कदम, युसुफ कुर्बान हुसैन जावरावाला, राजेश दळवी, दत्ताराम फाटक, बबन डोंगरे, नामदेव फाटक, बालारावजी भोसले.
म्हाडाची फसवणूक करुन या रहिवाशांनी ही घरे घेतली आहेत. ती ताब्यात घेण्याबाबत कारवाई सुरु केली जाणार आहे – मिलिंद शंभरकर, मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ