मुंबई : दक्षिण मुंबईतील धोकादायक, मोडकळीस आलेल्या तसेच एकल पुनर्विकास अशक्य असलेल्या इमारतींच्या समूह पुनर्विकासाचे सात प्रस्ताव महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) तयार केले असून या योजनेच्या व्यवहार्य अहवालानुसार रहिवाशांना म्हाडाने ५५० चौरस फुटाचे घर देऊ केले आहे. हे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाला सादर करण्यात आले असून त्यास मंजुरी मिळाल्यास सुमारे साडे तीन हजार रहिवाशांना हक्काची घरे मिळणार आहे.

दक्षिण व मध्य मुंबईत १९४० पूर्वीच्या सुमारे १३ हजारांहून अधिक इमारती आहेत. यापैकी अनेक इमारतींचा एकल पुनर्विकास होणे अशक्य आहे. उपकरप्राप्त, बिगर उपकरप्राप्त, पुनर्रचित, पंतप्रधान अनुदान योजनेतील या इमारतींचा समूह पुनर्विकास प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार म्हाडाने तूर्तास समूह पुनर्विकासाचे सात प्रस्ताव तयार करुन व्यवहार्य अहवाल शासनाच्या मंजुरीसाठी पाठविले आहेत. या सात पुनर्विकास प्रस्तावातून सुमारे १६ हजार कोटींचा महसूल म्हाडाला मिळणार असून निव्वळ नफा चार हजार कोटींचा होणार असल्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जायस्वाल यांनी सांगितले.

हा पुनर्विकास प्रकल्प खुल्या पद्धतीने निविदा मागवून करण्याचे प्रस्तावीत करण्यात आले आहे. या सर्व योजना व्यवहार्य असून विक्रीयुक्त क्षेत्रफळातून म्हाडाला सदनिकांच्या स्वरुपात सर्वाधिक क्षेत्रफळ देणाऱ्या विकासकाच्या प्रस्तावास मान्यता देण्याचे प्रस्तावीत करण्यात आले आहे. यासाठी म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्याचेही प्रस्तावीत करण्यात आले आहे.

पुढील इमारतींचा एकत्रित समूह पुनर्विकास (कंसात भाडेकरुंची संख्या) – सुखसागर, पवनछाया, सुयश, मंगलमूर्ती, गणेशकृपा, साई सदन सिद्धिविनायक आदी, राजाभाऊ देसाई मार्ग, माहिम (८७५), खेडगल्ली व इतर छोट्या इमारती, दादर पश्चिम (६६४), कादरी मॅन्शन, साकरबाई धानजी चाळ, म्युनिसिपल टीपी प्लॉट, सिद्धीप्रभा, उर्वशी ए व बी, गणेश निवास आदी (४६१), बोटावला चाळींचा समूह, दादर पश्चिम (२६५), छपरा, मोहसिन, कुलश्री, सितास्मृती, गणेश, सौदामिनी, मेघ, वरुण, राम भुवन, आकांक्षा, गुरुकृपा, अब्दुल रहमान आदी, प्रभादेवी (५२७), पुरुषोत्तम वाडी, जनार्दन अपार्टमेंट, दादर पश्चिम (३१०), खांडके वाडी चाळी, दादर पश्चिम (४०७).