मुंबई – म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून ना.म.जोशी मार्ग, वरळी आणि नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत पुनर्वसित इमारतींच्या कामाला वेग देण्यात आला आहे. वरळीतील ५५६ घरांच्या समावेश असलेल्या दोन इमारतींना नुकताच निवासी दाखला मिळाला असून आता लवकरच या घरांचा ताबा दिला जाणार आहे. तर दुसरीकडे वरळीतीली आणखी १४१९ घरांच्या कामाला वेग देण्यात आला असून या घरांचे काम पूर्ण करत या घरांचा ताबा डिसेंबरपर्यंत देण्याचे नियोजन मुंबई मंडळाचे आहे. त्याचवेळी नायगावमधील ८६४ घरांचेही काम वेगात सुरु असून या घरांचा ताबाही डिसेंबरमध्ये देण्यात येणार आहे. ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळीतील पहिल्या टप्प्यात ३४२ घरे बांधण्यात येत असून या घरांचा ताबा मात्र जानेवारी २०२६ मध्ये दिला जाण्याची शक्यता आहे.

रखडलेल्या बीडीडी चाळींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून मार्गी लावला जात आहे. या पुनर्विकासाअंतर्गत वरळीतील ९८६९ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ९८६९ पैकी ३८८८ घरांचे काम करण्यात येत आहे. १३ पुनर्वसित इमारतींमध्ये या घरांचा समावेश असून १३ पैकी दोन इमारतींचे काम पूर्ण झाले आहे. या दोन इमारतीत ५५६ घरांचा समावेश असून या घरांना निवासी दाखलाही मिळाला आहे. आता केवळ चावी वाटपाच्या कार्यक्रमाची प्रतीक्षा आहे. आता डिसेंबरमध्ये आणखी १४१९ घरांचा ताबा दिला जाणार आहे. त्या सहा इमारतींची कामे वेगात सुरु असून नुकताच या घरांच्या कामाचा आढावा वरिष्ठ अधिकार्यांकडून घेण्यात आला. त्यानुसार सहा इमारतींची कामे येत्या काही दिवसात पूर्ण करत डिसेंबरमध्ये या घरांचा ताबा देण्याचे नियोजन मुंबई मंडळाचे असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.

नायगाव येथील कामही वेगात

वरळीबरोबरच नायगावमधील पहिल्या टप्प्यातील पुनर्वसित इमारतींच्या बांधकामालाही वेग देण्यात आला आहे. नायगावमध्ये ३३४४ रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १९३८ घरांचे काम सुरु आहे. यातील ८६४ घरांचे काम येत्या काही महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेथील घरांचाही ताबा डिसेंबरअखेरपर्यंत देण्याचे नियोजन असल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरळीतील ५५६ रहिवाशांचे उत्तुंग, ४० मजली इमारतीत, ५०० चौ. फुटाच्या घरात रहायला जाण्याचे स्वप्न येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. तर त्यानंतर डिसेंबरमध्ये आणखी १४१९ रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नायगावमधील ८६४ कुटुंबाचेही घराचे स्वप्न डिसेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. ना.म.जोशी मार्ग येथील ३४२ कुटुंबांंना मात्र जानेवारी २०२६ पर्यंत वाट पाहावी लागणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळीतील १२४१ रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार आहे.